Nashik Crime News: दुसऱ्यांशी चॅटींग केल्याच्या संशयातून प्रेयसीची हत्या, सहा तासांत आरोपीला अटक, नाशिक येथील घटना
Murder | Representational Image (Photo Credits: Pixabay)

Nashik Crime News: नाशिकमध्ये एका प्रियकराने रागाच्या भरात आपल्या प्रेयसीचा दुपट्ट्याने गळा दाबून खून केल्याचं समोर आले आहे. मंगळवारी या घटनेनं नाशिक हादरलं होतं. दुसऱ्या व्यक्तीशी फोनवर चॅटींग करत असल्याच्या रागातून खून केल्याचे समोर आले आहे. मंगळवारी सांयकाळी तरुणीचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पंचवटी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक येथील रास बिहारी लिंक रोड वर ही घटना घडली. मारेकरूनी आणि त्याच्या साथीदारांनी मृतदेह एका मोकळ्या जागेत टाकून दिला. अवघ्या खूनाच्या सहा तासानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केले आहे. आरोपी सागर चिवदास तडवी अंबड येथे रहिवासी आहे. नंदूरबार येथील प्रियंका वीरजी वसावे आणि सागर प्रेम संबंधात होते. सागरला प्रियंकाविषयी संशय आल्याने रागाच्या भरात कृत्य केल्याचे समोर आले आहे.

एका तरुणीचा मृतदेह रस्त्यावर सापडल्याच्या तक्रारीवरून वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोहन माचरे यांच्या नेतृत्वा खाली पंचवटी पोलिसांनी तपास सुरु केला. तपासणी नंतर तरुणीचा मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलिसांनी मृताची ओळख पटवून चौकशी सुरु केली आणि दरम्यान घटनेची माहिती मृत तरुणीच्या कुटुंबियांना देण्यात आली. संशयिताला राहत्या घरातून तात्काळ ताब्यात घेतले. चोकशीत सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली त्यानंतर पोलिसांनी कसून चौकशी सुरु केली आणि आरोपी सागर यांने गुन्ह्याची कबुली दिल.पोलिसांनी आरोपीवर प्रेयसीच्या हत्तेचा गुन्हा दाखल केला..