Image used for Representational Purpose | (Photo Credits: File Photo)

कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण महाराष्ट्राला (Maharashtra) विळखा घातला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. ज्यामुळे राज्यातील नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहे. याचपार्श्वभूमीवर नाशिक (Nashik) येथे रुग्णवाहिकेतून पळून जाण्याच्या प्रयत्नात एका कोरोना संशयिताचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृत कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आला होता. त्यामुळे त्याला नामासर्डी पुलालगतच्या विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले होते. दरम्यान, रुग्णवाहिकेतून त्याला महापालिकेच्या अथवा खासगी रुग्णालयात नेले जाणार असताना त्याने दरवाजा उघडून पळ काढला. मात्र, त्याचवेळी त्याला हृदयविकाराच्या धक्का लागला. ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाबाधितांच्या संपर्कात आल्याने संबंधित व्यक्तीला समाज कल्याण विभागाच्या विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले होते. 4 जुलै रोजी त्याला भरती करण्यात आले असून दुसऱ्या दिवशी त्याचे कोरोनाची तपासणी करण्यासाठी नमुने घेतले जाणार होते. यासाठी त्याने खाजगी रुग्णालयात जाण्याचा आग्रह धरला. त्यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला वेगवेगळे पर्याय दिले होते. परंतु त्याने ते नाकारले. अखेर त्यास डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी रुग्णवाहिकेत बसविण्यात आले होते. मात्र, रुग्णवाहिका सुरू होताच संशयिताने दरवाजा उघडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी त्याला हृदयविकाराचा धक्का येऊन तो खाली कोसळला. त्यास तातडीने डॉ. जाकीर हुसेन रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तत्पुर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे. हे देखील वाचा- पुणे: कोंढवा येथील क्वारंटीन सेंटर मध्ये गळफास घेत 60 वर्षीय कोरोनाबाधित रूग्णाची आत्महत्या

नाशिक येथेही कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना दिसत आहे. नाशिक येथे एकूण 5 हजार 478 कोरोनाबाधित आहेत. यापैकी 242 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 3 हजार 159 जणांनी कोरोनावर मात केली आहे.