Kalpana Pande Passes Away: नाशिकच्या नगरसेविका कल्पना पांडे यांचे कोरोनामुळे निधन
Kalpana Pande| Photo Credits: Facebook

मुंबई पुणे पाठोपाठ आता नाशिक मध्येही कोरोनाचं थैमान चिंताजनक आहे. नाशिक मध्ये प्रभाग नंबर 24 च्या विद्यमान नगरसेविका कल्पना पांडे (Kalpana Pande)यांचं निधन झालं आहे. कल्पना पांडे या शिवसेनेच्या नगरसेविका होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर खाजगी रूग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान प्रकृती खालावल्याने त्यांची प्राणज्योत मालवली आहे. सध्या त्यांच्या निधनाची बातमी कळताच अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. Coronavirus In Nashik: नाशिक महानगर पालिका परिसरात Oxygen Cylinder सह आंदोलन करणाऱ्या कोरोना रुग्णाचा मृत्यू.

 

नाशिक महापालिका निवडणुकीमध्ये सलग चार वेळेस त्यांनी विजय मिळवला होता. त्यांना पालिकेत कामाचा उत्तम अनुभव होता. मतदारांशी संपर्क, विकासकामं पूर्ण करण्याचा झपाटा यामुळे त्या विशेष लोकप्रिय होत्या. कल्पना पांडे यांनी सिडको प्रभाग सभापती म्हणून दोन वेळा काम पाहिले आहे. तसेच नाशिक महापालिकेतील अनेक समित्यांवरही त्यांनी काम केले. आता त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नाशिक जिल्ह्यात काल (10 एप्रिल) मागील 24 तासांमध्ये कोरोना बाधितांच्या संख्येत 4294 रुग्णांनी वाढ झाली आहे. तर मागील 3 दिवसांत 100 जणांचे जीव गेले आहेत. राज्यात रेमडेसीवीरचा तुटवडा पाहता आता काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी ज्यांचं औषध आहे त्यांना त्यामागे नाव लिहण्याचे आदेश दिले आहेत. वाढती रूग्णसंख्या आणि अपुरी पडत चाललेली आरोग्य यंत्रणा पाहता आता नागरिकांनी कोविड नियमावलीचे कटाक्षाने पालन करण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान कालच राज्यात आमदार रावसाहेब अंतापूरकरांचा मृत्यू झाला आहे. भाजपच्या पालघर जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण वरखंडे यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे.