कोरोनाची (Coroanvirus) लागण होण्यापेक्षा अलीकडे या भीतीनेच अनेकांचे स्वास्थ्य बिघडत आहे. नैराश्य, तणाव, सततची चिंता यामुळे अन्य आजारांना आयतेच आमंत्रण मिळत आहे. हेच नैराश्य (Depression) नाशिक मधील एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची एक धक्कादायक घटना समोर येत आहे. नाशिक (Nashik) मध्ये एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याने तिच्या 23 वर्षीय तरुण मुलाने इतकी जास्त भीती मनात धरली की त्या चिंतेतून त्याने चक्क गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिक रोड उपनगर परिसरातील रोकडोबावाडी येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी या घटनेत अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस सध्या या प्रकरणात तपास करत आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची जिल्हानिहाय आकडेवारी; तुमच्या जिल्ह्यात किती कोरोना रुग्ण आहेत जाणून घ्या
प्राप्त माहितीनुसार, रोकडोबावाडी येथील रहिवाशी महिलेला कोरोनाची लागण झाली होती. काही दिवसांपासून त्यांच्यावर समाज कल्याण कार्यालयातील सेंटरमध्ये उपचार सुरु होते. त्यांचा 23 वर्षीय मुलगा काल (शुक्रवारी) आईला भेटण्यासाठी सुद्धा गेला होता. मात्र आईची अवस्था पाहून त्याला इतके जास्त नैराश्य आले की त्याने घरी येऊन पंख्याला फास लावून आपले प्राण संपवले आहेत.
दरम्यान, नाशिक मध्ये सुद्धा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. सध्याच्या आकडेवारीनुसार, नाशिक जिल्ह्यात एकूण कोरोना बाधितांचा आकडा 8 हजार 682 वर गेला. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 5 हजार 723 रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर एकूण मृतांचा आकडा 371 वर पोहचला आहे. सध्या 2 हजार 588 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.