'नारायण राणे यांनी आता गणिताचा अभ्यास करत बसावे, त्यांच्याच पनवतीने मा. देवेंद्र फडणवीस बुडाले'- शिवसेना नेते विनायक राऊत
विनायक राऊत आणि नारायण राणे

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर, राज्याच्या राजकारणाला कलाटणी मिळाली. त्यानंतर महाविकासआघाडीने पुन्हा जुळवाजुळव करून सत्तास्थापनेच्या शर्यतीत आपले स्थान बळकट केले. काल जोरदार शक्तीप्रदर्शन करत तीनही पक्षांचे 162 आमदार प्रथमच एकत्र आले होते. यावर भाजपच्या नारायणे राणे (Narayan Rane) यांनी ग्रँड हयातमध्ये पार पडलेल्या महाविकासआघाडीच्या ओळख परेडला 137 आमदारच उपस्थित होते, त्यामुळे त्यांचा 145 आकडा पार होणार नाही असा दावा केला होता. यावर प्रत्युत्तर देताना  नारायण राणे यांनी आता गणिताचा अभ्यास करत बसा असा टोला शिवसेनेने लगावला आहे.

काल पहिल्यांदाच राष्ट्रवादी-कॉंग्रेस-शिवसेनेचे मिळून 162 आमदार एकत्र आले होते. या सर्व आमदारांची जी बैठक पार पडली त्यावर टीका करत नारायण राणे यांनी या 137 आमदारांमध्येही विधान परिषदेच्या अनेक आमदारांचा भरणा होता, असा दावा केला होता. इतकेच नव्हे तर उद्धव ठाकरे मातोश्रीवर रोजच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत असतात अशी जहरी टीकाही केली होती. दुसरीकडे आज देवेंद्र फडणविस यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी ‘अखेर मा.. नारायण राणे यांच्या पनवतीने मा. देवेंद्र फडणवीस बुडाले’ अशा शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. (हेही वाचा: महाविकासआघाडीचे जोरदार शक्ती प्रदर्शन; पक्षश्रेष्ठींच्यासमोर 162 आमदारांनी घेतली एकनिष्ठ राहण्याची शपथ (Video)

इतकेच नव्हे तर नारायण राणे यांनी आता गणिताचा अभ्यास करत बसावे असा सल्लाही त्यांनी दिला आहे. भाजपच्या आशिष शेलार यांनीही पत्रकार परिषद घेऊन महाविकासआघाडीच्या कालच्या बैठकीवर जोरदार टीका केली. फोटोग्राफार तुमचा, फोटो तुमचा मात्र याचे फिनिशिंग आम्हीच करू असे ते म्हणाले होते. ज्या पद्धतीने 162 आमदार एकत्र आले होते त्याला त्यांनी एक पोरखेळ असे नाव दिले. तसेच तिथे 145 आमदारही नव्हते असेही ते म्हणाले होते.