केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना रत्नागिरी सत्र न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयाकडून जोरदार धक्का मिळाला आहे. त्यामुळे राणे यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे नारायण राणे जोरदार चर्चेत आले आहेत. सध्या त्यांच्या वक्तव्याचे पडसाद राज्यभर उमटत आहेत. नारायण राणे यांच्यावर नाशिक, पुणे आणि महाड अशा तीन ठिकाणी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे नाशिक पोलिसांची एक तुकडी रत्नागिरीकडे निघाल्याचे वृत्त आहे. दरम्यान, अटक टाळण्यासठी नारायण राणे यांनी प्रथम रत्नागिरी सत्र न्यायालयात जामीन अर्ज केला, जो न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर राणे यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालतही जामीन मिळावा आणि तातडीने सुनावणी घ्यावी अशी याचिका करण्यात आली. परंतू, तिही उच्च न्यायालायने फेटाळून लावली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर नारायण राणे यांच्याविरोधात नाशिक, पुणे आणि महाराष्ट्राच्या महाडमध्ये IPC कलम 500, 505 (2) आणि 153-B अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नारायण राणे यांचे वकील अनिकेत निकम यांनी उच्च न्यायालयात या प्रकरणी तातडीने सुनावणी घेण्याची मागणी केली होती. पण उच्च न्यायालयाने तातडीने सुनावणीसाठी आवश्यक असलेली प्रिसिप दाखल करण्यास सांगितले. त्यावर त्यांनी आपल्याकडे याचिकेची स्कॅन केलेली प्रत असल्याचे सांगितले व रजिस्ट्रीला ते स्वीकारण्याचे आदेश देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. यावर न्यायमूर्ती शिंदे यांनी, प्रक्रिया सर्वांसाठी एकसमान असल्याचे सांगितले. तसेच आमच्याकडून रजिस्ट्रीचे काम करण्याची अपेक्षा करू नका, असेही ते म्हणाले.
पुढे वकिलांनी असेही सांगितले की, पोलिसांनी सीआरपीसीच्या कलम 41 ए चे पालन केले नाही. ते म्हणाले की, नारायण राणे यांच्या विरोधात लावण्यात आलेल्या कलमांमध्ये 7 वर्षांपर्यंत कारावासाची तरतूद आहे, त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेण्यापूर्वी 41 ए अंतर्गत नोटीस जारी करायला हवी होती. मात्र, न्यायालयाने त्यांचा युक्तिवाद ऐकण्यास नकार दिला.
काय आहे प्रकरण?
महाडमध्ये जन आशीर्वाद यात्रा पोहोचल्यावर यात्रेदरम्यान सोमवारी, 8 ऑगस्ट रोजी बोलताना नारायण राणे नारायण राणे म्हणाले की, 'त्या दिवशी नाही का? किती वर्षे झाली देशाला स्वातंत्र्य मिळून… अरे हीरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखालीच चढवली असती.' (हेही वाचा: Sharad Pawar On Narayan Rane: नारायण राणे यांच्या आक्षेपार्ह्य वक्तव्यावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया)
दरम्यान, यामुळे भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये चांगलीच जुंपली. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गोंधळ घातला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार, युवा सेनेच्या तक्रारीनंतर मंगळवारी पुणे शहरातील चतुश्रृंगी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 153 आणि 505 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.