मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणात महाडच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्यांचा सशर्त जामीन मंजूर केला होता व त्यानुसार राणे यांना 30 ऑगस्ट रोजी अलिबाग पोलिसांसमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र नारायण राणे आज सोमवारी पोलिसांसमोर हजर झाले नाहीत. नारायण राणे यांच्या वकिलाने सांगितले की त्यांची प्रकृती ठीक नाही, त्यामुळे ते हजर राहू शकले नाहीत. नारायण राणे आज पोलिसांसमोर हजार होतील म्हणून, आज एसपी कार्यालयाबाहेर भल्या पहाटे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
नारायण राणे यांना गेल्या आठवड्यात मंगळवारी रत्नागिरीतून अटक करण्यात आली होती. त्यानंतर रात्री नारायण राणे यांना रायगड येथील महाड न्यायालयात दंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले. त्यावेळी त्यांना उशिरा जामीन मंजूर करण्यात आला. न्यायालयाने श्री राणे यांना 15,000 च्या जामिनावर जामीन मंजूर करताना 30 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबर रोजी अलिबाग (रायगड) येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात हजर राहण्याचे निर्देश दिले होते.
राणे यांच्या वक्तव्यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यात मोठा राजकीय वाद निर्माण झाला होता यासह अनेक ठिकाणी निदर्शनेही झाली. नारायण राणे यांच्यावर कलम 189, 504 आणि 505 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. (हेही वाचा: Maharashtra: अनिल देशमुख, अनिल परब यांना तुरूंगात जावच लागणार- किरीट सोमय्या)
यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्यापासून भाजपने स्वतःला दूर ठेवले. मात्र, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपण नारायण राणे यांच्यासोबत असल्याचे सांगितले. फडणवीस म्हणाले होते की, मुख्यमंत्र्यांवर केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक आहे, पण पक्ष त्यांच्या पाठीशी उभा आहे.