महाराष्ट्रातील पहिला निकाल जाहीर झाला आहे. नंदुरबारमध्ये महायुतीला मोठा झटका बसला आहे. कारण भाजपच्या दोन वेळा खासदार हीना गावित यांना पराभवाचा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या गोवाल पाडवी यांनी विजय मिळवला आहे. महाविकास आघाडीने नंदुरबारमधून विजयाचा गुलाल उधळला आहे.  नंदुरबार मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा भाजपच्या उमेदवार असलेल्या डॉ. हिना गावित (Heena Gavit) यांच्यासमोर यावेळी तगडे आव्हान होतं. गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले काँग्रेसचे के. सी. पाडवी यांचे पुत्र गोवाल पाडवी (Gowaal Padvai) यांनी हे आव्हान दिलं होतं. सुरुवातीला काँग्रेसचा गड राहिलेल्या नंदुरबारमध्ये भाजपने सलग दोनवेळा सत्ता मिळवली होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत चित्र पालटलेलं दिसत आहे. (हेही वाचा -  Sanjay Raut on Narendra Modi: 'नरेंद्र मोदी यांचा निरोप समारंभ पूर्ण झाला', संजय राऊत यांना इंडिया आघाडीच्या विजयाबद्दल खात्री)

नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात झाली. सुरुवातीपासूनच काँग्रेसच्या गोवाल पाडवी यांनी आघाडी घेतली होती. तर तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उभ्या असलेल्या हिना गावित पिछडीवर होत्या. नंदुरबार लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार गावित यांना मतमोजणीत सुरूवातीपासूनच धक्के हे पहायला मिळाले.

नंदुरबारमध्ये  काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची जाहीर सभा झाली असल्याने यंदा काँग्रेस कार्यकर्त्यांचाही आत्मविश्वास वाढला होता. नंदुरबारमध्ये डॉ. विजयकुमार गावित आणि शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्यातील वैर सर्वश्रृत आहे. त्याचा फायदा काँग्रेसच्या गोवाल पाडवींना होऊ शकतो. याशिवाय रघुवंशी यांनी गावितांवर असलेला आपला राग जाहीर नाराजीतून व्यक्त केला होता. त्यानंतर गावित कुटुंबीयांच्या कार्यशैलीवर टीका करीत शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षातील नेते, कार्यकर्ते प्रचारापासून लांबच आहेत.