महाराष्ट्रात मुंबईमध्ये झपाट्याने कोरोनाबाधितांच्या आकड्यामध्ये घट होत असताना आता नंदुरबार शहरामध्ये कोरोनाचा पहिला रूग्ण आढळला आहे. नंदुरबार शहरामध्ये काल (17 एप्रिल) रात्री उशिरा एका 48 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी ही माहिती देताना नागरिकांना 'कोरोना' ला घाबरू नका. घरातच रहा आणि स्थानिक प्रशासनाकडून देण्यात येणार्या सूचनांचे पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान खबरदारीचा उपाय म्हणून 20 एप्रिलपर्यंत नंदुरबार शहरातील वैद्यकीय सेवा व औषधांची दुकाने वगळता भाजीपाला, किराणा, पेट्रोलपंपसह इतर दुकानं, आस्थापनं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान याला नागरिकांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड केले आहे. Coronavirus Outbreak in India: भारत देशात एकूण 14,378 कोरोना बाधित तर 480 रुग्णांचा मृत्यू.
दरम्यान नंदुरबारमध्ये आढळलेला हा पहिला करोनाबाधीत रुग्ण आहे. प्राथमिक माहितीनुसार, हा रूग्ण नाशिकमधील मालेगावशी संबंधित असल्याची माहिती आहे. या रूग्णाची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून त्याच्या राहत्या परिसराला सील करत नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
20 एप्रिलपर्यंत कडक संचारबंदी
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून 20 एप्रिलपर्यंत #नंदुरबार शहरातील वैद्यकीय सेवा व औषधांची दुकाने वगळता इतर सर्व आस्थापना (भाजीपाला, किराणा, पेट्रोलपंपसह) बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांचे आदेश. नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन. @MahaDGIPR
— DISTRICT INFORMATION OFFICE, NANDURBAR (@InfoNandurbar) April 17, 2020
भारतामध्ये कोरोनाबाधितांनी 14 हजारांचा टप्पा पार केला आहे. तर देशातील सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात असल्याने राज्य सरकारसमोर कोरोनाचा फैलाव रोखण्याचं मोठं आव्हान होतं. मात्र आता हळूहळू त्यावर नियंत्रण मिळत आहे. मुंबई शहरामध्ये मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधित होण्याचं प्रमाण कमी होत आहे. सुरूवातीला 2 दिवसांत दुप्पट होणारी कोरोनाबाधितांची संख्या आता सहा दिवसांवर पोहचला आहे.