Nanded ST Bus Accident: बस उलटून 15 जण जखमी,चार वर्षीय बालकासह 5 जण गंभीर; नांदेड जिल्ह्यातील बामणी फाटा येथील घटना
Accident | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

ST Bus Accident: एसटी बस उलटून झालेल्या अपघातात 15 जण गंभीर जखमी झाले आहेत. यात चार वर्षीय बालकासह पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. कंधार (Kandhar Taluka) तालुक्यातील बामणी फाटा (Bamni Phata) येथे ही घटना गुरुवारी (27 एप्रिल) दुपारी घडली. जखमींवर नांदेड (Nanded) येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चढणीचा रस्ता पार करताना चालकाचा बसवरील ताबा सुटला. बसने रस्ता सोडला आणि बस नाल्यात जाऊन उलटली.

प्राप्त माहितीनुसार, कंधार आगाराची बस बाचोटी, हाळदा मार्गे नायगावच्या दिशेने निघाली होती. बस प्रवाशांनी खचाखच भरली होती. बसमध्ये साधारण 72 प्रवासी होते अशी माहिती आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असलेली ही बस चढणीचा रस्ता पार करत होती. या वेळी बस चालक एन. एम. ईबीतवार यांचा बसवरील ताबा सुटला. पावसामुळे रस्त्यावर चिखल झाला होता. त्या चिखलावरुन बस घसरली आणि रस्ता सोडून नाल्यात जाऊन उलटली. (हेही वाचा, ST Employee Suicide: नांदेड मध्ये एसटी बस चालकाची आत्महत्या; जिल्ह्यातील तिसरा बळी)

अपघातामध्ये बस चालक, वाहक यांच्यासह इतरही प्रवासी जखमी झाले. जखमी प्रवाशांची नावे खालीलप्रमाणे.

संताजी हौसाजी शिनगारपुतळे (वय 75 वर्षे, रा.बामणी), श्रीकांत जळबा लूक्कडवाड (वय 15 वर्षे, रा.जंगमवाडी नांदेड), गोविंद बाबुराव पांचाळ (वय 35 वर्षे, रा कोलंबी), मारोती धोंडीबा पवळे (वय 75 वर्षे, रा. चिखली) आणि अंजनाबाई कोंडीबा कांबळे (वय 60 वर्षे, रा. सुलतानपुरा कंधार) हे पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. तर, शिवार आनंदा आईलवाड (वय 35 वर्षे, रा.चिखली) , कृष्णाबाई गोविंदराव पांचाळ (वय 30 वर्षे, रा. कोलंबी), गिरीधर गोविंद पांचाळ (वय 4 वर्षे, रा. कोलंबी), सदाशिव रामा कोंडेवाड (वय 70 वर्षे, रा. बाचोटी), रुक्मिणी लक्ष्मण हुंदाडे (वय 60 वर्षे, रा. बामणी), अर्चना आनंदा आईलवाड (वय 20 वर्षे, रा चिखली), नारायण दिगंबर ठाकूर (वय 38 वर्षे, रा. मुक्ताईनगर कंधार) अशी इतर जखमींची नावे आहेत.