Lockdown in India | File Image | (Photo Credits: PTI)

नांदेड जिल्ह्यात कोरोना व्हायरसचा (Coronavirus) वाढता प्रार्दुभाव लक्षात घेता येथील प्रशासनाने 12 जुलै मध्यरात्रीपासून 20 जुलैपर्यंत संचारबंदी (Lockdown) लागू केली आहे. या जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. नांदेडचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर (Dr. Vipin Itankar) यांनी याबाबत माहिती दिली आहे. या संचारबंदी दरम्यान अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सेवा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यामुळे येथील नागरिक या नियमांचे पालन करत आहे की नाही यासाठी विविध पथके प्रशासनाकडून नेमण्यात आली आहे.

नांदेड जिल्ह्यात 155 रुग्ण आढळले असून 4 रुग्ण दगावले आहेत. 12 जुलै ते 20 जुलै दरम्यान ठेवण्यात आलेल्या संचारबंदी मध्ये काही महत्त्वाचे नियम घालण्यात आले आहेत.

1. सर्व शासकीय कार्यालये, कर्मचारी, शासकीय वाहने व शासकीय कर्मचाऱ्यांना सूट देण्यात आली आहे. मात्र, त्यांना ओळखपत्र सोबत बाळगणे बंधनकारक केले आहे.

2. सर्व शासकीय व खासगी रुग्णालये, औषधी दुकाने, आरोग्य कर्मचारी व वैद्यकीय रुग्णालयातील कर्मचारी, अत्यावश्यक सेवा, पशुवैद्यकीय दवाखाने, औषधालयांना सूट देण्यात आली.

3. प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांचे संपादक, वार्ताहर, प्रतिनिधी, वर्तमानपत्र वितरक यांनाही सूट दिली आहे.

4. जिल्ह्यातील रास्तभाव दुकाने सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत चालू ठेवण्यात येणार असल्याचे या आदेशात नमूद करून आठवडी बाजारात भाजीपाला, फळ विक्री करण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत.

5. भाजीपाला विक्रेत्यांना सकाळी 7 ते 2 या वेळेत घरपोच विक्री करता येईल.

6. दूध विक्रेत्यांना एका ठिकाणी थांबून दूधविक्री करता येणार नाही, त्यांनीही 7 ते 2 या वेळेत घरपोच दूध विक्री करावी. Coronavirus Update: महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची मनपा व जिल्हानिहाय आकडेवारी जाणून घ्या एका क्लिक वर

7. शेतीसंबंधित मशागती व खत, बी-बियाणे विक्रीसाठी सकाळी 7 ते 2 या वेळेत परवानगी देण्यात आली आहे. मालवाहतूक सेवा पूर्ववत सुरू राहणार आहे.

8. जिल्ह्याच्या बाहेर जाण्यासाठी व जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी वैद्यकीय व अत्यावश्यक कारणाशिवाय ई-पास आधारेच प्रवासाची मुभा दिली आहे

या संचारबंदीचे नीट पालन होत आहे की नाही हे पाहण्यासाठी मनपा, नगरपालिका, गावपातळीवर प्रमुखांसह पोलीस विभाग यांनी संयुक्त पथके गठीत करावीत, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी निर्गमित केले आहेत.