Nana Patole Tested Positive For Coronavirus: महाराष्ट्र पावसाळी अधिवेशनाच्या 2 दिवस आधी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोना विषाणूची लागण; प्रकृती उत्तम असल्याची माहिती

कोरोना विषाणू (Coronavirus) उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रात पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Session) सुरळीत पार पडण्यासाठी व कार्यकाळात सभासदांना सुरक्षित ठेवण्याची तयारी सुरू झाली आहे. राज्यात 7 सप्टेंबरपासून पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. आता महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) हे पावसाळी अधिवेशनाच्या अवघ्या 2 दिवस आधी कोरोना विषाणू पॉझिटिव्ह असल्याचे आढळले आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर नाना पटोले यांनी घरीच स्वत: ला वेगळे ठेवले आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्वीट करत माहिती दिली आहे. ही बातमी समजताच राज्यातील अनेक नेत्यांनी त्यांच्या लवकर बरे होण्याची प्रार्थना केली आहे.

आपल्या ट्वीटमध्ये नाना पटोले म्हणतात, ‘गेली अनेक दिवस माझ्या मतदारसंघासह संपूर्ण विदर्भात पूरपरिस्थिती आहे आणि त्यासोबतच विविध कामांसंबंधी अनेक दौरे करावे लागले. यादरम्यानच मला कोरोनाची लक्षणे जाणवू लागल्यामुळे मी माझी कोरोना चाचणी करवून घेतली आणि ती चाचणी पॉझिटिव्ह आली. मी सध्या ठणठणीत आहे, आपण काळजी करू नये.’ ते पुढे म्हणतात, ‘गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी स्वतःची कोरोना चाचणी करून घ्यावी. मी लवकरच कोरोनावर मात करून आपल्या सर्वांच्या सेवेत दाखल होईन.’ (हेही वाचा: पुण्यात कोरोनासंक्रमित रुग्णांचा आकडा 1 लाखांच्या पार- महापौर मुरलीधर मोहोळ)

नाना पटोले ट्वीट -

महाराष्ट्रामध्ये यंदा 7 व 8 सप्टेंबर रोजी अवघ्या दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन होत आहे. विधानसभेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की दोन दिवसीय अधिवेशनासाठी सर्व आमदारांसाठी अनिवार्य 'अँटीजेन' चाचणी, कोविड-19 किटचे वितरण आणि सदस्यांमधील शारीरिक अंतर सुनिश्चित करण्यासाठी नवीन आसन व्यवस्था केली गेली आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विधानसभेच्या इतिहासातील सर्वात लहान अधिवेशन आयोजित केले जात आहे. मात्र त्याआधी 2 दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण झाली आहे. या गोष्टीमुळे अधिवेशनाच्या कार्यक्रमात काही बदल झाले आहे का, याबाबत अजूनतरी कोणतीही माहिती सरकारकडून देण्यात आली नाही.