Nagpur Violence

नागपूरमधील हिंसाचाराचा (Nagpur Violence) सूत्रधार मानल्या जाणाऱ्या फहीम शमीम (Fahim Khan) खानला पोलिसांनी अटक केली आहे. तो 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत आहे. फहीम खान हा मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टी (एमडीपी) चा शहर अध्यक्ष आहे. त्याने केंद्रीय मंत्री आणि ज्येष्ठ भाजप नेते नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपूरमधून लोकसभा आणि विधानसभा निवडणूकही लढवली आहे. दोन्ही निवडणुकीत त्याचे डिपॉझिट जप्त झाले. पोलीस एफआयआरमध्ये, फहीमचे नाव इतरांच्या नावांसह आरोपींच्या यादीत नमूद केले आहे. असा आरोप आहे की, त्याने सुरुवातीला पोलीस स्टेशन गाठले आणि बजरंग दलाविरुद्ध तक्रार आणि लोकांना भडकावले.

खानवर लोकांना हिंसाचारासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. पोलिसांचा दावा आहे की, फहीमने जमावाला भडकवण्यासाठी चिथावणीखोर विधाने केली होती, त्यानंतर परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. पोलिसांनी फहीम खानसह 51 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नागपूरमध्ये 17 मार्च 2025 रोजी औरंगजेबाच्या थडग्याच्या निषेधार्थ हिंदू आणि मुस्लिम समुदायांमध्ये हिंसाचार उसळला. विश्‍व हिंदू परिषद (VHP) आणि बजरंग दलाच्या सदस्यांनी औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. या निषेधानंतर अफवा पसरल्या की, आंदोलनादरम्यान धार्मिक चिन्हे असलेली गोष्ट जाळण्यात आली.

यामुळे मुस्लिम समुदायामध्ये संताप वाढला आणि त्यांनी प्रत्युत्तरादाखल आंदोलन केले. संध्याकाळनंतर या आंदोलनाचे रुपांतर मोठ्या हिंसाचारात झाले. या हिंसाचारात किमान 70 लोक जखमी झाले, ज्यामध्ये 34 पोलीस अधिकारी आणि 36 नागरिकांचा समावेश आहे. पोलीसांनी 50 हून अधिक जणांना अटक केली आहे. हिंसाचारानंतर नागपूरच्या काही भागांमध्ये अनिश्चित कालावधीसाठी कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंसाचाराचा निषेध केला असून, शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे. (हेही वाचा: Aurangzeb Tomb Row: नागपूर हिंसाचाराचे पडसाद उत्तर प्रदेशमध्ये; शिवसेना कार्यकर्ते Bittu Sikheda यांच्याकडून औरंगजेबाची कबर उध्वस्त करणाऱ्याला '5 बिघा जमीन' बक्षीस जाहीर)

​या घटनेमुळे नागपूरमध्ये तणावाचे वातावरण आहे, आणि प्रशासनाने शांतता राखण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. नागपूर पोलिसांचे सायबर युनिट सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल करणाऱ्या लोकांचीही चौकशी करत आहे. 100 ते 150 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासले जात आहे. माहितीनुसार, नागपूर हिंसाचाराला जबाबदार असलेल्यांनी अल्पवयीन मुलांचा वापर केला होता. यामुळे नागपूर पोलिसांनी 5 अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. अल्पवयीन मुलांकडून हिंसाचार कोणी रचला होता आणि अल्पवयीन मुलांना हिंसक जमावाचा भाग कसे बनवले गेले याचाही पोलीस तपास करत आहेत.