नागपूर: सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, हवाई सुंदरीसह एका तरुणीची सुटका
Sex Racket | Representational Image | (Photo Credit: PTI)

नागपूरात (Nagpur) सेक्स रॅकेटचा (Sex Racket) पर्दाफाश करण्यात आला असून यातून हवाई सुंदरी सह एका तरुणीची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. सेंट्रल एव्हेन्यूवरील ओयो टाऊन हाऊस हॉटेलमध्ये छापा टाकत पोलिसांनी 25 वर्षीय दोन तरुणींची सुटका केली आहे. तसंच दोन दलालांसह तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तुषार ऊर्फ सुल्तान कन्हैय्या पारसवानी (26), नीलेश दिनदयाल नागपुरे (19) आणि रजत डोंगरे (24) अशी या आरोपींची नावे आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, तुषार हा या व्यवसायाचा सुत्रधार असून इंदूर आणि कोलकता येथील दलालांशी त्याचा संपर्क आहे. इंदूर येथील दलालाने एका हवाई सुंदरीला तर कोलकता येथील दलालांनी एका तरुणीला नागपूरात पाठवले. त्यानंतर तुषारने ग्राहकांशी संपर्क करण्यास सुरुवात केली. तर नागपुरे हा तुषारचा सहकारी तरुणींना हॉटेलमध्ये पोहचवत असे. याबाबत गुन्हे शाखा पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी सापळा रचला आणि बनावट ग्राहक बनून तुषारशी संपर्क साधला. तुषारने हॉटेलमध्ये रुम बुक करण्यास सांगितले. त्यानंतर बनावट ग्राहक बनलेल्या पोलिसांनी सेंट्रल एव्हेन्यूवरील हॉटेलमध्ये रुम बुक केली. (मुंबई: कांदिवली येथील हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; अभिनेत्रीसह 4 तरुणींची सुटका)

हवाई सुंदरी आणि अन्य एका तरुणीसह तुषार, नागपुरे आणि रजतसह तेथे पोहचला. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकत या तुषार व त्याचे दोन सहकारी यांना अटक केली. तर हवाई सुंदरी आणि तरुणीची सुखरुप सुटका करण्यात आली. पोलिसांनी तुषार, रजत आणि नागपुरे यांच्या विरुद्ध अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी ही तुषारला 2018 मध्ये पोलिसांनी अटक केली होती. प्रत्येक ग्राहकाकडून 15 हजार रुपये घेणारा तुषार तरुणींना चार हजार देऊन 11 हजार रुपये स्वतःच्या खिशात घालत असे.