Nagpur Fire: नागपूरच्या कोविड केअर रुग्णालयात आग; 4 जणांचा मृत्यू, अनेकजण जखमी 
Visual from hospital. (Photo Credits: ANI)

सध्या महाराष्ट्र कोरोना विषाणू (Coronavirus) महामारीसी लढा देत आहे. अशात राज्यात इतरही अनेक आपत्ती ओढावत आहेत, ज्यामुळे प्रशासनावरील ताण वाढत आहे. महाराष्ट्रातील नागपूर (Nagpur) जिल्ह्यातील वाडी परिसरातील वेलट्रीत कोविड रुग्णालयात (Well Treat Covid Hospital) आज रात्री आठच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीमध्ये चार जणांचा मृत्यू झाला आहे. अग्निशमन विभागाच्या म्हणण्यानुसार आगीच्या घटनेत इतर अनेक लोक जखमी झाले आहेत. हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर आग लागली, ती आयसीयूपर्यंत पोहोचली, त्यानंतर तिथे दाखल झालेल्या रूग्णांना त्वरेने खाली आणण्यात आले.

या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या सहा गाडय़ा घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या रुग्णालयातील आग आटोक्यात आणली गेली आहे. या आगीच्या घटनेत रुग्णालयाचे मोठे नुकसान झाले आहे. नागपूर पोलिसांनी सांगितले, ‘रुग्णालयात सुमारे 27 रूग्ण होते ज्यांना दुसर्‍या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आम्ही सध्या तरी त्यांच्या आरोग्याच्या स्थितीबद्दल काहीही सांगू शकत नाही. रुग्णालय पूर्ण रिकामे केले गेले आहे.’ या ठिकाणी आग नक्की कशी सुरू झाली हे अद्याप समजू शकलेले नाही.

एसीमधील शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. या घटनेत रुग्णालयातील एक डॉक्टर जखमी झाल्याची माहिती आहे. नागपुरात कोरोना व्हायरसची प्रकरणे मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. गेल्या 24 तासांत येथे 6,489 नवीन रुग्ण आढळले आहेत. संक्रमणामुळे 64 लोकांचा मृत्यू झाला आहे. मात्र, गेल्या 24 तासांत नागपूरमधील 2 हजार 175 लोक कोरोनाहून बरे झाले आहेत. (हेही वाचा: महाराष्ट्रात 97 लाखांहून अधिक नागरिकांना दिली कोरोना विषाणू लस; देशात सर्वाधिक लसीकरण करून महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर)

दरम्यान, नागपुरातील रुग्णवाढ लक्षात घेता अमरावती सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये बेड राखीव ठेवण्यात येणार आहे. ग्रामीण भागात ऑक्सीजन बेडची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. मेडिकल, मेयो, एम्स शालिनीताई मेघे, लता मंगेशकर येथे पेशंट आणताना कॉल सेन्टरची मदत घेण्याचे आवाहन केले गेले आहे.