महाराष्ट्रातील नागपूरमध्ये (Nagpur) खोट्या बलात्काराच्या (Rape) तक्रारीची एक घटना समोर आली आहे. या ठिकाणी एका 19 वर्षीय महिलेने आपल्या प्रियकरासोबत लग्न करण्याच्या प्रयत्नात पोलिसांकडे सामूहिक बलात्काराची खोटी तक्रार दाखल केली. यामुळे नागपूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आपले कर्मचारी तैनात केले. नागपूरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 1,000 हून अधिक सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सोमवारी या प्रकरणाचा तपास केला, असे अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले. याप्रकरणी तरुणीने कळमना पोलिस ठाण्यात सकाळी अकराच्या सुमारास तक्रार दाखल केली होती.
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, या तक्रारीनंतर शहरभरातील 250 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज स्कॅन केल्यानंतर या महिलेने सामूहिक बलात्काराची खोटी कथा रचल्याचा निष्कर्ष तपासकर्त्यांनी काढला. नंतर प्रियकराशी लग्न करण्यासाठी हे कृत्य केल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. अधिकाऱ्यांनी मुलीचे खरे प्लॅन्स काय आहेत हे सांगितले नाही. तत्पूर्वी, महिलेने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत चिखली परिसरातील एका निर्जन ठिकाणी दोन लोकांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला होता.
प्रकरणाचे गांभीर्य ओळखून शहर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. कळमना पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमान्वये अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला त्यानंतर पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी व इतर वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी सीताबर्डी पोलीस ठाण्यात पोहोचले. (हेही वाचा: अकोला जिल्ह्यातील गायगाव येथे एक संतापजनक प्रकार, प्रेयसीने बुरखा का घातला?, म्हणत एका टोळक्यानं तिच्या प्रियकराला केली बेदम मारहाण)
अधिकाऱ्याने सांगितले की, कुमार यांनी शहरातील सीसीटीव्ही फुटेज, व्हॅन तपासण्यासाठी आणि महिलेच्या मित्रांची चौकशी करण्यासाठी 1,000 हून अधिक पोलिस कर्मचार्यांच्या 40 विशेष टीम्स तयार केल्या. दरम्यान, मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी मायो हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले. पुढे सहा तासांहून अधिक मेहनत आणि 50 हून अधिक लोकांची चौकशी केल्यानंतर पोलीस या निष्कर्षाप्रत आले की महिलेने सामूहिक बलात्काराची खोटी कथा रचली होती. चौकशीदरम्यान, प्रियकराशी लग्न करण्यासाठी हे कृत्य केल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले.