Heavy Rain in Nagpur: मुसळधार पावसामुळे खापरखेडा वीजनिर्मिती प्रकल्प (Khaparkheda Power Plant) परिसरातील राखेचा बंधारा फुटला आहे. ज्यामुळे परिसरातील शेती क्षेत्र आणि काही गावांमध्ये पाणी घुसले आहे. शिवाय राखेचा चिखल शिवारात परसरल्याने होणाऱ्या हानीचा धोकाही वाढला आहे. पाठिमागील वर्षी घडेल्या घटनेचीच यंदाही पुनरावृत्ती झाली आहे. फक्त यंदा ठिकाण बदलले आहे. गेल्यावर्षी कोराडी येथे घटना घडली आता खापरखेडा येथे घडली. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो आहे. नागपूर येथेही पावसाची संतधार सुरु आहे. वारेगाव येथील वीज प्रकल्प परिसरातली मोठ्या प्रमाणावर पाऊस आहे.
राखेचा बंधारा फुटल्याने परिसरातील जवळपास 20 एकरातील पीके उद्ध्वस्त झाली आहेत. आजूबाजूच्या गावातही राखेचे पाणी घुसले आहे. प्रशासनाला घटनेची माहिती कळताच तातडीने उपाययोजना करण्याचा प्रयत्न करण्यात आला. तलाव दुरुस्त करुन पाण्याला बांध घालून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु आहेत.
नागपूर जिल्ह्यात खापरखेडा आणि कोराडी असे दोन औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत. हे विद्युत प्रकल्प सुरु असताना त्यातून मोठ्या प्रमाणावर राखेचे उत्सर्जन होते. ही राख साठविण्यासाठी वारेगाव खसाळा-मासला परिसरात जवळपास दीड हजार एकर परिसरावर मोठा बंधारा बांधण्यात आला आहे. जो मंगळवारी रात्री फुटला. त्यामुळे वारेगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर चिखल पाहायला मिळतो आहे.
बंदाऱ्याला तडे गेल्याने हा बंधाऱ्यातून राख वाहण्याची शक्यता आहे. ही राख परिसरातील शेतात पसरते त्यामुळे पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी होते. आताही परिसरतील जवळपास 20 एकर क्षेत्रावरील पीक उद्ध्वस्त झाले आहे. हाता तोंडाला आलेले पीक राखेने बाधीत झाल्याने शेतकऱ्यांनी नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी केली आहे.
बंधारा फुटल्याची माहिती मिळताच नागपूर येथील जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, कामठीचे तहसीलदार आणि इतरही काही प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.त्यांनी परिस्थितीची माहिती घेऊन नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या शेतीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले.