सोशल मीडिया ही आजच्या आधुनिक जगातील सगळ्यांना परिचित असलेली कालानुरूप संकल्पना. आज लहानथोरांपासून प्रत्येकाच्या जीवनाचा सोशल मीडिया हा अपरिहार्य भाग आहे. फेसबुक, ट्विटर वा इन्स्टाग्रामने आज प्रत्येकाचे दैनंदिन आयुष्यच बदलून टाकले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून जगाच्या टोकाला असणाऱ्या व्यक्तीच्या संपर्कात राहता येत आहे. याचपार्श्वभूमीवर एका अल्पवयीन मुलाने सोशल मीडियाच्या माध्यमातून आक्षेपार्ह भाषेचा वापर करत अनेक महिला आणि मुलींना मानसिक त्रास दिल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी नागपूर पोलिसांनी एका जणाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील चौकशीला सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी गुजरातमधील रहिवाशी आहे. तो फेसबूकच्या माध्यमातून शाळेकरी मुली किंवा महिलांना फ्रेन्ड रिक्व्हेस्ट पाठवायचा. त्यानंतर त्यांच्या संपर्कात राहून अश्लील भाषेत संवाद साधायचा. मुलींनी त्याच्यावर आक्षेप घेतला किंवा ब्लॉक केले, तर आरोपी स्वतःच्या आणि संबंधित मुलीच्या नावाने बनावट खाते काढून नातेवाईकांना आणि मित्र-मैत्रिणींना अत्यंत अश्लील मेसेज पाठवून संबंधित मुलीची बदनामी करायचा. एवढेच नव्हेतर, व्हिडिओ कॉल करूनही मुलींशी अश्लील कृत्य करायचा. याप्रकरणी नागपूर येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, आरोपी हा गुजरातमधील खेडा जिल्ह्यातील रहिवाशी असल्याचे माहिती पोलिसांना मिळाली. परंतु, राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग सुरू असल्याने संबंधित आरोपीला गुजरातमध्ये जावून अटक करणे शक्य नसल्याने नागपूर पोलिसांनी स्थानिक पोलिसांची मदत घेतली. त्यानंतर गुजरात पोलिसांनी चौकशीला सुरुवात करत काही तासांतच आरोपीच्या मुसक्या आवळल्या. हे देखील वाचा- Four Children Drowned in Bhima River: धक्कादायक! भीमा नदीत पोहण्यास गेलेल्या एकाच कुटुंबातील 4 मुलांचा बुडून मृत्यू
गुजरात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा 16 वर्षाचा अल्पवयीन असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यावेळी पोलिसांनी आरोपीकडून काही सीम कार्ड आणि मोबाईल फोन जप्त केले आहेत. आरोपी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी त्याला ताकीद देऊन सोडून दिले आहे. पण माफीनामा लिहून सुटका झाल्यानंतरही त्याने मुलींना त्रास देणे सुरू असल्याचे वृत्त लोकमतने दिले आहे.