रेल्वे प्रवासामध्ये झालेल्या किरकोळ वादाचे पर्यावसण मोठ्या भांडणात होऊन एकास प्राण गमवावे लागले आहेत. नागपूर जिल्ह्यातील बुट्टीबोरी ते गुमगाव दरम्यानच्या रेल्वेमार्गावर धावत्या ट्रेनमधून एका प्रवाशाला बाहेर फेकल्याने (Youth Died traveling from Buttibori to Gumgaon In Running Train) ही घटना घडली. या घटनेत अकबर शेख नामक व्यक्तीचा मृत्यू झाला. रेल्वे प्रवासादरम्यान पाय लागल्याच्या कारणावरुन प्रवाशांच्या दोन गटामध्ये वाद निर्माण झाला. त्यातून एका गटाने हे धक्कादायक कृत्य केले यात अकबर शेख नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाला.
अकबर शेख नामक व्यक्ती रेल्वे प्रवास करत नागपूरकडे निघाला होता. तो उरुस पाहण्यासाठी निघाला होता अशी प्राथमिक माहिती आहे. रेल्वे प्रवासादरम्यान त्याचा ट्रेनमधीलच एका सहप्रवाशाला पाय लागला. यातून अकबर शेख आणि दुसरा प्रवासी यांच्यात किरकोळ वाद झाला. या वादातून संतप्त प्रवाशाने अकबर याला धावत्या ट्रेनमधून खाली फेकून दिले. यात अकबरचा मृत्यू झाला. पोलिसांना सदर घटनेची माहिती कळताच पोलिसांनी प्राप्त माहितीच्या आधारे एका संशयितास ताब्यात घेतले आहे. (हेही वाचा, संतप्त प्रवाशांसमोर मध्य रेल्वेची नरमाईची भूमिका, 10 एसी लोकल सेवा बंद; जितेंद्र आव्हाड यांनी दिला होता जनआंदोलनाचा इशारा)
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, काही तरुण उरुस पाहण्यासाठी अकोला येथून नागपूरला निघाले होते. ते सर्वजण गरिबरथ रेल्वेतून प्रवास करत होते. गाडीत मोठ्या प्रमाणावर गर्दी होती. अशा वेळी लोक डब्यात जागा मिळेल तेथे उभे होते. हे तरुणही डब्यात दरवाजाजवळ उभे होते. यावेळी एका तरुणाचा पाय दुसऱ्या तरुणाला लागला. त्यातून या दोन गटांमध्ये वाद झाला. या वेळी दुसऱ्या गटातील एका व्यक्तीने अकबर यास पाठिमागून जोराचा धक्का दिला. परिणामी अकबर रेल्वेतून बाहेर फेकला गेला. अकबर सोबत असलेल्या इतर मित्रांनी रेल्वे पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी वर्णनावरुन एका संशयितास ताब्यात घेतले आहे. प्रकरणाचा तपास सुरुच आहे.