Image used for representational purpose only (Photo Credits: PTI)

मुंबईमध्ये (Mumbai) सध्या एसी लोकल गाड्यांबाबत (AC Local Train) प्रवाशांमध्ये नाराजी आहे. रेल्वेने 10 नव्या एसी गाड्या सुरु केल्या होत्या व त्यासाठी नॉन-एसी गाड्यांच्या फेऱ्या कमी केल्या. त्यात 5.22 वाजता बदलापूरसाठी सीएसएमटीहून सुटणारी लोकल रद्द करून त्या जागी एसी लोकल सुरू केल्याने, अंबरनाथ, बदलापूरचे हजारो रेल्वे प्रवासी संतप्त झाले होते. यामुळे राजकारणही तापल्याने आता मध्य रेल्वेने नरमाईची भूमिका घेतली आहे. मध्य रेल्वेने माहिती दिली आहे की, नव्याने सुरु करण्यात आलेल्या 10 एसी लोकल उद्यापासून बंद केल्या जाणार आहे. त्यांच्या जागी नॉन-एसी गाड्या धावतील.

मुंबई लोकल गाड्यांची संख्या कमी करून एसी लोकल गाड्यांची संख्या वाढवली तर लोक रस्त्यावर उतरतील, असा इशारा राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिला होता. नेतृत्वाशिवाय कोणतेही आंदोलन सुरू झाले तर ते भयंकर असल्याचे आव्हाड यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. लोकांच्या मनात निर्माण झालेला राग एका क्षणी स्फोटकाच्या स्वरूपात बाहेर येतो व त्याला पुन्हा नियंत्रित करणे कठीण होते. ठाणे आणि बदलापूरमध्ये दिसून आलेला जनक्षोभ मुंबईत सर्वत्र पाहायला मिळेल, असे आव्हाड यांनी सांगितले.

याआधी जितेंद्र आव्हाड म्हणाले होते की, मध्य रेल्वेने एसी लोकलच्या फेऱ्या वाढवल्याच्या विरोधात ठाणे, बदलापूर येथील जनतेने केलेले आंदोलन आता प्रत्येक स्थानकावर दिसेल. एसी लोकलच्या फेऱ्या वाढल्याने सर्वसामान्यांना आता ट्रेनमध्ये चढण्यासाठी जास्त वेळ थांबावे लागत आहे. सामान्य लोकल ट्रेनऐवजी एसी गाड्या आल्या, तर फलाटावरील गर्दी आणखी वाढते. अशा परिस्थितीत उशिरा येणाऱ्या लोकल गाड्यांमध्ये चढण्याचा त्रास वाढतो आणि ट्रेनमध्ये चढणे आणखी कठीण होते.

लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या सर्वसामान्यांची नाराजी उघडपणे समोर येत आहे. मध्य रेल्वे सर्वसामान्य प्रवाशांचा विचार करण्याइतकी संवेदनशील नसल्याने मुंबई लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या या समस्येबाबत आता राष्ट्रवादी काँग्रेस जनआंदोलन उभारणार आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले होते. (हेही वाचा: Ganeshotsav 2022: गणपती उत्सवादरम्यान अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी पश्चिम रेल्वे जादा गाड्या सोडणार)

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, मध्य रेल्वेचे उत्पन्न देशात सर्वाधिक आहे. आर्थिक संकट नसतानाही सामान्य लोकल रद्द करून एसी लोकल चालवण्याला महत्त्व दिले जात आहे. मात्र वस्तुस्थिती अशी आहे की, 10 एसी लोकल ट्रेनमध्ये 5700 लोक प्रवास करतात तर 1 एसी लोकल ट्रेनमध्ये 2700 लोक प्रवास करतात. सर्वसामान्य प्रवाशांना एसी लोकलचा खर्च उचलणे अवघड झाले आहे. सर्वसामान्य प्रवाशांची काळजी रेल्वेला घ्यावी लागणार आहे. आता अशा परिस्थितीत रेल्वेने एसी लोकल तात्पुरत्या थांबवण्याचा निर्णय घेतला आहे.