
अखेर राज्यात नव्या महाविकास आघाडीचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला आहे. आता नवनिर्वाचित मंत्र्यांसाठी दालन वाटपाचे काम सुरू आहे. प्रत्येक मंत्र्याला त्यांच्या आवडीनिवडीप्रमाणे दालन देण्यात येत आहे. मात्र मंत्रालयातील 602 नंबरचे दालन घेण्यास कोणीही तयार नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही ते दालन घेण्यास नकार दिला असून, ते सीताराम कुंटे यांचे दालन घेणार आहेत. 602 नंबरच्या दालनाबद्दल असलेला गैरसमज आणि पसरलेली अफवा यांमुळे ते दालन घेण्यास कोणीही तयार नाही. या दालनात जो कोणी मंत्री बसतो त्याचा कार्यकाल पूर्ण होत नाही असा या दालनाबद्दल गैरसमज पसरला आहे.
मंत्रालयात सहाव्या मजल्यावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची दालने आहेत. मात्र 602 नंबरचे दालन घेण्यास कोणी तयार नाही. या दालनामध्ये एक कॉन्फरन्स रूम, कार्यलयीन कर्मचाऱ्यासाठी हॉल आणि दोन मोठ्या केबिन आहेत. असे असूनही अजित पवार यांनी सहाव्या मजल्यावरील सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांचे दालन घेण्यास तयारी दर्शवली आहे. यामुळे आता या दालनाविषयीच्या शंका कुशंकांना अजूनच वाव मिळाला आहे. या दालनात जो मंत्री बसतो त्याची प्रगती होत नाहे, त्याचा कार्यकाळ पूर्ण होत नाही असा समज पसरला आहे. (हेही वाचा: मंत्रिमंडळ विस्तार झाला, खातेवाटप एक-दोन दिवसांत जाहीर करु: उद्धव ठाकरे)
याआधी भाजप सरकारमध्ये एकनाथ खडसे यांना हे दालन मिळाले होते. या दालनातून कृषी, महसूल आणि अल्पसंख्यांक कल्याण विभागाचे कामकाज चालायचे. मात्र खडसे यांना 2 वर्षातच राजीनामा द्यावा लागला. त्यांच्यानंतर कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर हे या कार्यालयात बसू लागले. मात्र त्यांचे दोन वर्षांनी हृदयविकाराने निधन झाले. पुढे 2019 मध्ये भाजपचे कृषिमंत्री अनिल बोंडे हे याच दालनात बसले, मात्र त्यानंतर त्यानंतर झालेल्या विधानसभेत बोंडेंचा पराभव झाला. या सर्व घटना पाहता कोणताही मंत्री हे दालन घेण्यास धजावत नाही.