ठाणे जिल्ह्यात पहाटेपासूनच दमदार पावसाने हजेरी लावल्याने काही भागात जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे मुरबाडहून वाशिंदकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चिखले गावातील काळू नदीवरील पूल पुराच्या पाण्याखाली गेला आहे. या पाण्याच्या वाढलेल्या प्रवाहामुळे शहापूर तालुका आणि मुरबाड तालुक्यातील सुमारे 18 गाव-पाड्यांचा संपर्क पहाटेपासून तुटला आहे. ठाणे जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच, हवामान खात्यामार्फत पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या वाढत्या पातळीवर ग्रामीण भागातील आपत्ती व्यवस्थापन लक्ष ठेऊन आहे. (हेही वाचा - NDRF Rescue villagers in Palghar: पालघर येथील सुसगावमध्ये पुरात अडकलेल्या 16 जणांची एनडीआरएफच्या टीमकडून सुटका (Watch Video))
ठाणे जिल्ह्यातील काळू नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून डोंगर भागातील घाट माथ्यावर सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नदीच्या पातळीत वाढ झाल्याचे सांगण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्याच, पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापन विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
ठाणे जिल्हाधिकारी कार्यलयाकडून स्थानिक यंत्रणांना भुस्खलन होऊ शकणाऱ्या गावांची आणि क्षेत्रांची पाहणी करून आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करुन तेथील स्थानिक जनतेला याबाबत माहिती देण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. पुराच्या पाण्याखाली गेलेला पूल हा शिरगाव, चिखले, झापवाडी, मुरबाड तालुक्यातील गावांसाठी संपर्करस्ता आहे.