Municipal Corporation Election 2021 in Maharashtra: नव्या वर्षात महाविकासआघाडी विरुद्ध भाजप रंगणार सामना; नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, औरंगाबादसह 'या' 5 ठिकाणी पार पडतील महानगरपालिका निवडणुका
Election 2021 in Maharashtra | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

कोरोना व्हारस संकटामुळे स्थगित झालेल्या किंवा लांबणीवर पडलेल्या सर्व निवडणुका बहुदा 2021 या नववर्षात पार पडण्याची (Municipal Corporation Election 2021 in Maharashtra) शक्यता आहे. यात प्रामुख्याने ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदा आणि त्यासोबतच नगरपरिषद, नगरपालिका, महापालिका, महानगरपालिका निवडणुकांचा (Mahanagar Palika Election) समावेश आहे. सन 2021 मध्ये औरंगाबाद, कोल्हापूर, कल्याण-डोंबिवली (KDMC Election 2021) , नवी मुंबई आणि वसई-विरार या पाच महानगरपालिकांसाठी फेब्रुवारी महिन्यात निवडणूक पार पडू शकते. त्यासाठी जानेवारीत किंवा त्याच्या आसपास निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.

2021 मध्ये निवडणूक पार पडणाऱ्या संभाव्य महापालिका

  • नवी मुंबई महानगरपालिका (NMMC Election 2021)
  • कल्याण-डोंबिवली महानगरपालिका (KDMC Election 2021)
  • वसई विरार शहर महानगरपालिका (Vasai Virar City Municipal Corporation )
  • कोल्हापूर महानगरपालिका (Kolhapur Municipal Corporation)
  • औरंगाबाद महानगरपालिका (Aurangabad Municipal Corporation)

महाविकासआघाडीमुळे समिकरणे बदलली

विधनसभा निवडणूक 2019 नंतर राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांसोबत महाविकासआघाडी उदयास आली आणि राज्यातील राजकारणाचे समिकरणच बदलून गेले. त्यामुळे या बदलत्या राजकारणाचे पडसाद आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही पाहायला मिळणार आहेत. प्रामुख्याने हे पडसाद शहरी भागांमध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये पाहायला मिळतील. (हेही वाचा, Kolhapur Municipal Election 2021: कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर; अनेकांचा वाजला राजकीय बँड)

शिवसेना विरुद्ध भाजप

शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष प्रामुख्याने शहरी म्हणून ओळखले जातात. 2014 नंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसह इतर काही निवडणुकांत या पक्षांचे उमेदवार ग्रामिण भागातही निवडूण आले आहेत. मात्र, असे असले तरी या दोन्ही पक्षांमध्ये शहरांतील निवडणुकांमध्ये रंगणारा सामना काहीसा वेगळाच असतो. याचे काहीसे प्रात्यक्षीक या आधी झालेल्या मुंबई महापालिका आणि कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकांमध्ये पाहायला मिळाला आहे.

दरम्यान, राज्यातील राजकीय पक्ष महापालिका निवडणुका आघाडी, युती द्वारे लढतात की स्वतंत्रपणे स्वबळ आजमावतात यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. कारण या नव्या युत्या आघाड्या यांवरही जनमत फिरु शकते. शेवटी जनतेचा आदेशच अंतिम असणार आहे हे निश्चित.