Kala Ghoda Festival: संस्कृती आणि कला यांचे मिश्रण असलेला लोकप्रिय काळा घोडा महोत्सव (Kala Ghoda Festival) येत्या 2 फेब्रुवारीपासून मुंबई येथे सुरु होत आहे. संगीत, नृत्य, साहित्य, नाटक अशा अनेक कलांचे विविधांगी दर्शन या महोत्सवामध्ये घडते. त्यामुळे येत्या काही दिवसांत मुंबईला भेट देणार असाल तर काळा घोडा फेस्टिवलला नक्की भेट द्या. 2 ते 10 फेब्रुवारी असा 9 दिवस हा फेस्टिवल चालणार आहे. यंदाचे या महोत्सवाचे 20 वे वर्ष असणार आहे. महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीचे औचित्य साधून विविध कलाकृतींच्या माध्यमातून त्यांना मानवंदना दिली जाईल. सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत हा महोत्सव चालणार आहे.
1999 पासून या महोत्सवाला सुरुवात झाली. या महोत्सवामध्ये कलाकारांकडून विविध कला सादर केल्या जातात. संगीताचे, नाटकांचे कार्यक्रम होतात. हाताने बनवलेल्या विविध गोष्टींची विक्री केली जाते. जगभरातून तमाम कलेचे भोक्ते खास या फेस्टिवलसाठी या काळात मुंबईला भेट देतात.
यावर्षीच्या महोत्सवाचे आकर्षण –
> प्रख्यात दिग्दर्शक खालिद मोहम्मद यांची इराणी कॅफे यावरील खास डॉक्युमेंट्री
> पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचे बासरीवादन
> फॉर द थिएटर लव्हर्स- नाटकक्षेत्रातील दिग्गज सुचित्रा कृष्णमूर्थी या नाट्यप्रवेश सादर करतील
> हेरिटेज वॉक – शहरातील महत्वाच्या ठिकाणांची सफर
> डान्स इट आउट- विविध प्रकारांतील (पाश्चिमात्य ते भारतीय शास्त्रीय नृत्य यांचे फ्युजन) 20 नृत्याविष्कार फेस्टिव्हलमध्ये सादर करण्यात येतील.
> द एव्हरग्रीन शान- गायक शानच्या गाण्यांचा कार्यक्रम
हा फेस्टिवल विविध कला लोकांपर्यंत पोहचवण्याचे काम करतो. तसेच याद्वारे नवोदित कलाकारांनाही आपली कला लोकांंसमोर सादर करण्याची संधी मिळते.