Favipiravir (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) उपचारासाठी जगातील अनेक देश, मोठ मोठ्या कंपन्या झटत आहेत. रात्रंदिवस एक करून या विषाणूवरील लस अथवा औषध शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशात एक आशेचा किरण म्हणजे, मुंबईच्या (Mumbai) ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सने (Glenmark Pharmaceuticals), फेवीपिरावीर (Favipiravir) अँटीव्हायरस टॅब्लेटला फॅबिफ्लू (FabiFlu) या ब्रँड नावाने बाजारात आणले आहे. सौम्य ते मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांच्या उपचारासाठी याचा वापर होईल. कंपनीने शुक्रवारी सांगितले की हे औषध तयार करण्यासाठी आणि बाजारात आणण्यासाठी त्यांना,  ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) कडून परवानगी मिळाली आहे.

कंपनीने म्हटले आहे की कोविड-19 च्या उपचारांसाठी फेवीपिरावीर हे पहिले औषध आहे, जे मंजूर झाले आहे. ग्लेनमार्क फार्मास्यूटिकल्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक ग्लेन सल्दान्हा म्हणाले की, ‘भारतामधील कोरोना ग्रास्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना या औषधाला परवानगी मिळाली आहे, ही एक दिलासादायक बाब आहे.’ यापूर्वी, कोविड-19 ची परिस्थिती आणि वैद्यकीय आवश्यकता विचारात घेऊन, ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने जलद परवानगी देण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून, 'फेवीपिरावीर' गोळी (200 मिलीग्राम) तयार आणि विक्री करण्याची ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्सना परवानगी दिली होती.

सल्दान्हा म्हणाले की, ‘क्लिनिकल चाचण्यांमध्ये कोरोना व्हायरसच्या सौम्य संक्रमणाने ग्रस्त रूग्णांवर, फॅबिफ्लूने फार चांगले परिणाम दर्शविले आहेत. या व्यतिरिक्त हे एक फूड ड्रग आहे, जे उपचारांचा एक सोयीस्कर पर्याय आहे. कंपनी सरकार आणि वैद्यकीय समुदायाशी जवळून काम करेल, जेणेकरुन हे औषध देशभरातील रुग्णांपर्यंत सहज उपलब्ध होईल. (हेही वाचा: भायखळा येथील Richardson & Cruddas कंपनीच्या इमारतीत COVID-19 रुग्णांसाठी BMC कडून 1000 बेड्ससह क्वारंटाईन सेंटर तयार)

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हे औषध प्रति टॅबलेट 103 रुपये किंमतीवर उपलब्ध असेल. पहिल्या दिवशी, 1800 मिलीग्रामचे दोन डोस घ्यावे लागतील. त्यानंतर, 800 मिलीग्रामचे दोन डोस 14 दिवसांसाठी घ्यावे लागतील. ग्लेनमार्क फार्मा यांनी सांगितले की, मधुमेह किंवा हृदयविकाराचा त्रास असलेल्या रुग्णांनाही हे औषध दिले जाऊ शकते.