मुंबई: भायखळा (Byculla) परिसरात स्थित राणीच्या बागेत (Rani Baug) लवकरच दोन नवीन पाहुणे मुंबईकरांना पाहायला मिळणार आहेत. वीरमाता जिजाबाई उद्यान म्हणजेच राणीच्या बागेत नुकतंच दोन बिबट्यांचे (Leopard) तसेच 'जॅकल'(Jackal) (कोल्ह्या सारखा दिसणारा प्राणी) यांचे आगमन झाले आहे. मंगळुरूच्या (Mangluru) पिलिकुला प्राणी संग्रहालयातून (Piliikula Zoo) या दोन दुर्मिळ प्राण्यांना आणण्यात आले आहे. सध्या भायखळाच्या प्राणिसंग्रहालयात या प्राण्यांच्या राहण्यासाठी जागा तयार करण्यात येत असून हे काम महिन्याभरात पूर्ण होईल असा अंदाज वर्तवला जातोय. मात्र या प्राण्यांना जवळून पाहण्यासाठी मुंबईकरांना जून 2019 पर्यंत वाट पाहावी लागणार आहे.
भायखळा प्राणिसंग्रहालयाचे निर्देशक संजय त्रिपाठी यांनी टाइम्स ऑफ इंडिया ला दिलेल्या माहितीनुसार, 28 एप्रिलला या दोन बिबट्याना मुंबईत आणण्यात आले. यातील नर बिबट्याचे वय 2वर्षे असून त्याचे नाव 'ड्रॉगोन' तर मादीचे वय 3 वर्ष असून तिचे नाव 'पिंटो' असे ठेवण्यात आले आहे. या प्राण्यांना ठेवण्यासाठी पिंजऱ्याचे बांधकाम पूर्ण होईपर्यंत त्यांना क्वारंटाईन सेंटर (Qurantine Center) मध्ये ठेवण्यात आले आहे. या दोन्ही प्राण्यांना सध्या तीन ते चार किलो वजनाच्या मांसाचा खुराक दिला जात आहे तसेच वेगळ्या प्रांतातून आणल्यामुळे त्यांच्या तब्येतीवर सतत चेक ठेवण्यासाठी डॉक्टर देखील रुजू करण्यात आले आहेत.
मे महिन्याच्या सरतेशेवटी केंद्रीय प्राणिसंग्रहालयाच्या (Central Zoo) परवानगीने या संग्रहालयात दोन सिंह देखील आणले जाणार आहेत. याचबरोबर झेब्रा, जिराफ, चिंपांझी व फ्लॅमिंगो या प्राण्यांना आणण्यासाठी संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरु आहेत. या प्राण्यांसोबत गुजरात प्रांतातून पांढरे सिंह तर औरंगाबाद विभागातून वाघ आणायचा देखील विचार असल्याचे सूत्रांकडून सांगितले जातेय.
मागील वर्षी या राणीच्या बागेत काही पेंग्विन्स आणल्यानंतर त्यांच्यासाठी अनुकूल निवास्थान निर्माण करण्यावर अनेक प्रश्न उभे राहिले होते, त्यातील एका पेंग्विनच्या मृत्यूने हा वाद बराच चिघळला ही गेला होता मात्र या प्राण्यांमुळे संग्रहालयाला भेट देणाऱ्यांच्या संख्येत कमालीची वाढ झाल्याने आता हे नवीन प्राणी आणण्याचा निर्णय घेतला गेला आहे.