फळविक्रेत्या सोबत झालेला वाद झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या (Zomato Delivery Boy) जीवावर बेतला आहे. फळविक्रेत्याने झोमॅटो डिलिव्हरी बॉयची हत्या केल्याची घटना समोर आली असून यामुळे एकच खळबळ उडाली आहे. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आरोपींना सहा तासाच्या आत पकडण्यात यश आले आहे. एका गुन्हेगाराला हिरानंदानी रुग्णालयाजवळून पकड्यात आले तर दुसऱ्याला कुर्ला टर्मिनस येथून अटक करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी सचिन सिंग व त्याचा साथीदार जितेंद्र रायकर यांच्यावर कलम 302 आणि कलम 34 या अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पवई येथील एका हॉटेल बाहेर फळाची गाडी लावण्यावरून फळ विक्रेत्यासोबत झालेला वाद झोमॅटो डिलिव्हरी बॉय अमोल सुरतकर याच्या जीवावर बेतला. या वादाचे रुपांतर हाणामारीत झाल्यानंतर फळविक्रेता सचिन याने रागाच्या भरात अमोल याच्या छाती व पोटावर चाकूने वार केले. त्यानंतर अमोल याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. (मुंबई: विक्रोळी मध्ये 22 वर्षीय डिलिव्हरी बॉयची चाकूने भोकसून हत्या; आरोपी फरार; पोलीस तपास सुरु)
या सर्व प्रकारानंतर फळविक्रेता सचिन आणि त्याचा साथीदार जितेंद्र हे उत्तर प्रदेशातील आपल्या मूळ गावी फरार होण्याच्या प्रयत्नात होते. परंतु, मुंबई पोलिसांनी त्यांना अवघ्या सहा तासात जेरबंद केले. फळगाडी लावण्यावरुन अमोल व सचिन यांच्यात वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर येत आहे. तसंच अमोल आणि त्याचा मित्र आमच्याकडून वारंवार फुकटात फळे घेत असल्याची माहिती आरोपींनी पोलिसांनी दिली आहे.
गेल्या वर्षी मुंबईतील दादर भागात भाजी विक्रेत्याने भाजीच्या किंमतींवरून वाद घालणाऱ्या ग्राहकावर चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली होती. या प्रकारानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला होता.