मुंबईच्या (Mumbai) भुलेश्वर येथील एका जनरल स्टोअरमधील 38 वर्षीय सेल्समनला एलटी मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. गेल्या चार वर्षांत त्याने काम करत असलेल्या दुकानातून तब्बल 44 लाखांहून अधिक रुपयांची चोरी केल्याचे उघड झाले आहे. रिटालाल महातो असे या आरोपीचे नाव आहे. दुकानातून पैसे चोरून तो आपल्या बँक खात्यावर जमा करायचा. त्याच्या बँक व्यवहारात ही रक्कम दिसून आली असल्याचे पोलिसांनी सांगितले. महातो हा मूळचा झारखंडचा रहिवासी आहे.
2017 पासून तो मुंबईच्या भुलेश्वर येथील सपन पापडवाला आणि जनरल स्टोअरमध्ये काम करत आहे. या ठिकाणी आधी तो मिठाई बनवायचा, मात्र नंतर त्याने मालकाचा विश्वास संपादन केला. जुना कर्मचारी असल्याने मालकानेही त्याच्यावर विश्वास ठेवत शॉप काउंटर सांभाळायला दिला. ग्राहकांकडून मालाचे पैसे स्वीकारणे हे त्याचे काम होते. आताच्या दिवाळीच्या काळात महातोने सुका मेवा खरेदीबद्दल एका ग्राहकाकडून 5,000 रुपये घेतले, मात्र, ते पैसे कॅश काउंटरमध्ये जमा करण्याऐवजी त्याने ते स्वत:कडे ठेवले.
हीच गोष्ट सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजवर लक्ष ठेवणाऱ्या त्याच्या मालकाने पाहिली. याबाबत मालकाने त्याच्याकडे विचारणा केली असता, महातोने चोरीची कबुली दिली आणि दुसऱ्याच दिवसापासून कामावर जाणे बंद केले. यामुळे मालकाचा संशय आणखी वाढला आणि त्याने पोलिसात तक्रार दाखल केली. तपासादरम्यान, पोलिसांनी त्याचे बँक व्यवहार तपासले आणि खात्यात मोठ्या प्रमाणात रक्कम जमा झाल्याचे आढळले. (हेही वाचा: Theft: भारतीय लष्कराच्या केंद्रातून सहा चंदनाची झाडे चोरीला, येरवडा पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू)
ऑक्टोबर 2017 ते डिसेंबर 2020 दरम्यान त्याच्या चार बँक खात्यांमध्ये एकूण 31.25 लाख रुपये जमा करण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले. महातोचा मासिक पगार ₹17,000 होता आणि त्याच्याकडे उत्पन्नाचे दुसरे कोणतेही साधन नव्हते, असेही पोलिसांनी सांगितले. बँकेतील व्यवहारातून निदर्शनास आले की, त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात रोकड जमा झाली आहे. त्यानंतर शुक्रवारी पोलिसांनी त्याला काळबादेवी परिसरातून ताब्यात घेतले.