Mumbai: संपूर्ण लॉकडाऊन आईच्या मृतदेहासोबत घरात एकटीच राहिली महिला; शेजाऱ्यांच्या तक्रारीनंतर समोर आली ही धक्कादायक घटना
Death | Representational Image | (Photo Credits: Twitter)

मुंबईमध्ये (Mumbai) एका 53 वर्षीय महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. ही महिला गेले काही महिने तिच्या आईच्या मृतदेहासह घरात राहत असल्याचे समजल्यानंतर, पोलिसांनी ही कारवाई केली आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मार्चमध्ये 83 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता आणि तिची ही मुलगी (जेनी- नाव बदलले आहे) मानसिकरित्या आजारी असल्याने, घडलेली गोष्ट कोणालाही सांगू शकली नाही. अशाप्रकारे वांद्रे (पश्चिम) येथील Chuim Village मध्ये अहमद बेकरीजवळ राहणारी जेनी संपूर्ण लॉक डाऊन आपल्या आईच्या मृतदेहासोबत होती. शेजाऱ्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शुक्रवारी मृतदेह शोधून काढला.

शेजाऱ्यांनी तक्रार केली होती की, जेनी घराच्या खोलीमधून आईचा मृतदेह शोधून काढण्यासाठी घरातील कचरा खिडकीबाहेर फेकत आहे. त्यानंतर पोलीस जेनीच्या घरी पोहोचले. जेव्हा पोलिसांनी दाराची बेल वाजवली, तेव्हा आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही, परंतु त्यांना काही आवाज ऐकू आले. घराचा दरवाजा अर्धवट उघडा होता आणि संपूर्ण घर विखुरलेले होते. खार पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक गजानंद कबुडुले यांनी ही माहिती दिली.

जेव्हा अधिकारी बेडरूममध्ये गेले तेव्हा जेनी कॉटवर बसून होती. त्याच्या खाली एका चादरीने झाकलेली माणसाच्या आकाराची एक आकृती पोलिसांना दिसली. याबाबत जेनीकडे विचारणा केली असता ती काही सांगू शकली नाही. त्यानंतर पोलिसांनी चादर उघडून पहिली असता, त्यांना सांगाड्याचे अवशेष असलेले मानवी शरीर आढळले. त्यांनतर रुग्णवाहिका बोलावून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला गेला.

मृत महिलेचा मुलगा दुबईमध्ये राहत असून एक मुलगी कॅनडामध्ये आहे. त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आपली बहिण मानसिकदृष्ट्या आजारी असल्याचे सांगितले. तसेच पोलिसांनाच आपल्या आईवर अंत्यसंस्कार करण्याची विनंती केली. आता जेनीला जे जे हॉस्पिटलमध्ये पाठवले आहे, जिथे तिची प्रकृती चिंताजनक आहे. (हेही वाचा: रुग्णवाहिका उशिरा आल्याने 25 वर्षीय गर्भवती महिलेवर ओढावला मृत्यू)

जेनीला घेऊन गेल्यानंतर तिच्या शेजाऱ्यांनी पोलिसांना सांगितले की, ‘तिला कोणी मित्र नव्हते तसेच ती मानसिकदृष्ट्या आजारी होती व म्हणूनच घडलेली गोष्ट ती कोणालाही सांगू शकली नाही. अशा परिस्थितीमध्ये नक्की काय करावे हे कदाचित तिला माहित नव्हते. जर ही गोष्ट आम्हाला समजली असती तर, आम्ही तिच्या आईच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था केली असती. ती एक चांगली व्यक्ती होती.’