मुंबई शहरामध्ये 26 जानेवारीपासून पुन्हा परतणार थंडी; हवामान खात्याचा अंदाज
Winter 2020 (Photo Credits: IANS)

Mumbai Winter 2020:  मुंबई शहरामध्ये मागील आठवड्यात नागरिकांना हुडहुडी भरवणारी थंडी एका दिवसांतच गायब झाली. मात्र आता येत्या 26 जानेवारीपासून शहरामध्ये पुन्हा थंडीचा कडाका जाणवणार आहे. मुंबई हवामान खात्याकडून त्याबाबतचा इशारा वर्तवण्यात आला आहे. मागील काही दिवसांमध्ये मुंबई शहरात कमाल तापमानामध्ये वाढ झाल्याने दुपारच्या वेळेत मुंबईकरांना घामाच्या थारा लागत आहेत.

बुधवार (22 जानेवारी) दिवशी मुंबई शहरामध्ये किमान तापमान 18.3 अंश डिग्री सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले होते. सांताक्रुझ येथील हवामान खात्याच्या नोंदीनुसार, सध्या सामान्य तापमानापेक्षा मुंबई मध्ये किमान तापमान 1.5 अंश अधिक आहे. कुलाबा वेधशाळेमध्ये मुंबई शहरातील किमान तापमान 19.5 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे. ते सामान्य पेक्षा 0.5 अंश अधिक आहे.

हवामान खात्याचे अधिकारी के.एस.होसाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा दक्षिण मध्य महाराष्ट्रात तसेच उत्तर महाराष्ट्रामध्ये थंडीचा कडाका यंदा अधिक जाणवणार आहे. यंदा 26 जानेवारीपासून सुरू होणारी थंडी थोडी जास्त काळ राज्यात रेंगाळेल असे देखील त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान मुंबई शहरामध्ये मागील आठवड्यात किमान तापमान सुमारे 11 अंशापर्यंत खाली गेले होते. त्यादिवशी मुंबईकरांना हुडहुडी भरवणार्‍या थंडीचे मिम्स देखील व्हायरल झाले होते. पण पुढील काही तासांतच थंडी गायब झाली आहे. सध्या मुंबईत थंडी नसली तरीही आभाळ निरभ्र असून वातावरण प्रसन्न आहे.