Mumbai Rain | Representational image (Photo Credits: pxhere)

Mumbai Rain Update: मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आज (शुक्रवार, 8 सप्टेंबर) दिवसभर हलका, मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यासोबतच आकाशही ढगाळ राहण्याची शक्यता आहे. पावसाची शक्यता गृहीत धरुन प्रशासनाने किनारपट्टी लगतच्या लोकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे. हवामान विभागने (IMD) दिलेल्या माहितीनुसार शहरात पाठीमागील 24 तासात सरासरीपेक्षा अधिक पाऊस (Rain News Mumbai) झाला आहे. विभागाने विविध भागांमध्ये नोंदवली गेलेली पर्जन्यवृष्टीची आकडेवारीही दिली आहे.

मुंबई शहरांमध्ये पाठीमागील 24 तासात झालेल्या पावसाची विविध ठिकाणी नोंदवली गेलेली आकडेवारी पुढील प्रमाणे- मध्य मुंबईत (CT): 65.36 मिमी, पुर्व उपनगरांमध्ये (ES): 89.08 मिमी, तर पश्चिम उपनगरांमध्ये (WS): 96.69 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली. दुसऱ्या बाजूला आज समुद्राला भरतीही येणार आहे. त्यामुळे किनारपट्टीवर 2.73 मीटर उंचीच्या लाटा उसळल्याचे पाहायला मिळू शकते. भरती-ओहोटीमुळे किनारपट्टीलगतच्या भागात पाणी पातळी लक्षणीयरित्या वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे किनारपट्टीलगत राहणाऱ्या नागरिकांनी या काळात सतर्क राहून आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे अवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, हवामान विभागाने (IMD) महाराष्ट्रातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी यलो अलर्ट जारी केला आहे. खास करुन मध्यप्रदेश, महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांमध्ये पुढील 3 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे IMD ने 'X' वर एका पोस्टमध्ये म्हटले आहे. उत्तर महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशसह भारताच्या अनेक भागांमध्ये गडगडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

राज्यात पाऊस पुन्हा सक्रीय झाला तर बळीराज्यासबत राज्य सरकारही सुटकेचा निश्वास टाकणार आहे. ऐन पावसाल्यात राज्यातील अनेक ठिकाणी पाण्याची दैना आहे. पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वणवन भटकावे लागत आहे. इतकेच नव्हे तर राज्यात उपवाद वगळता जवळपास सर्वच ठिकाणी दुबार पेरणीचे संकट उद्भवले आहे. पावसाने हजेरी लावल्यास शेतकऱ्यांची दुष्काळाच्या तावडीतून सुटका होणार आहे.