Mumbai Water Cut Update: मुंबई मध्ये 30, 31 जानेवारीला पाणीपुरवठ्यामध्ये कपात; पहा कुठे अंशतः कुठे पूर्ण पाणी कपात
Water Cut | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

मुंबईकरांना जानेवारी महिन्याच्या अखेरीस पाणी सांभाळून वापरण्याचं विशेष आवाहन करण्यात आलं आहे. मुंबई मध्ये 2 ठिकाणी दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने 30 आणि 31 जानेवारीला मुंबईच्या काही भागात पाणी कपात होणार आहे. भांडूप संकुलामध्ये जलशुद्धीकरण केंद्राला अजून 4000 मिलीमीटर व्यासाची एक जलवाहिनी जोडण्याचं काम बीएमसीने हाती घेतले आहे. तसेच भांडूप मध्ये 2 ठिकाणी जलवाहिन्यांवर झडपा बसवण्याचं काम, नवी जलवाहिनी जोडणीचं काम हाती घेतल्याने जवळपास निम्म्या मुंबईच्या पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम होणार आहे.

बीएमसीच्या माहितीनुसार, 30 जानेवारीला सकाळी 10 ते 31 जानेवारीला सकाळी 10 वाजेपर्यंत हा पाणीपुरवठा खंडीत राहणार आहे. 24 पैकी सुमारे 12 भागांमध्ये पाणीपुरवठा खंडीत राहणार आहे. 2 भागांमध्ये 25% पाणी कपात केली जाईल. मुंबई मध्ये पश्चिम उपनगरांत के पूर्व, के पश्चिम, पी दक्षिण, पी उत्तर, आर दक्षिण, आर मध्य, आर उत्तर, एच पूर्व आणि एच पश्चिम या भागामध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे खंडीत असणार आहे. तर पूर्व उपनगरामध्ये एस,एनआणि एल विभागात पाणीपुरवठा खंडीत असेल.

दरम्यान 'जी उत्तर' आणि 'जी दक्षिण' या प्रभागात येणार्‍या माहीम पश्चिम, दादर पश्चिम, प्रभादेवी व माटुंगा पश्चिम येथील पाणीपुरवठा 30 आणि 31 जानेवारी 2023 रोजी 25 टक्के कमी असणार आहे. तर धारावी परिसरातील ज्या भागात दुपारी 4 ते सायंकाळी 9 या दरम्यान पाणीपुरवठा होतो. त्या भागात 30 जानेवारी 2023 रोजी पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवला जाईल. त्यामुळे मुंबईकरांना पाणी काटकसरीने वापरण्याचे आणि दोन दिवसासाठी साठवून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.