मुंबई: वॉशिंग मशीनचा स्फोट, कुटुंब थोडक्यात बचावले; वांद्रे पश्चिम येथील घटना
Washing-Machin-Blast | Image only representative purpose (Photo credit: File Photo)

मुंबई (Mumbai) शहरातील वाद्रे पश्चिम (Bandra West) परिसरातील लिंकिंग रोडवर असलेल्या एका इमारतीत शुक्रवारी (12 जुलै 2019) रोजी एक धक्कादायक घटना घडल्याचा प्रकार पुढे आला आहे. येथील एका इमारतीच्या सहाव्या मजल्यावर असलेल्या फ्लॅटमध्ये वॉशिंग मशीन स्फोट (Washing Machine Explosion) धक्कादायकरित्या झाला. इमारतीमधील रहिवासी नेहा चोप्रा (Neha Chopra) यांच्या फ्लॅटमध्ये ही घटना घडली. स्फोटाची घटना घडल्यानंतर शेजाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला.

मिड डे ने या घटनेबाबत वृत्त दिले आहे. या वृत्तानुसार, नेहा चोप्रा या त्यांची आई कमल सेहगल (वय वर्षे 74) आणि मुलगी श्रेया आणि कुटुंबियांसोबत राहतात. ही घटना घडली तेव्हा नेहा चोप्रा या घरात नव्हत्या. योगा वर्गासाठी त्या बाहेर गेल्या होत्या. तर त्यांची आई कमल सेहगल आणि मुलगी श्रेया या वेगवेगळ्या खोलीत होत्या. दरम्यान, वॉशिंग मशिनाचा स्फोट झाला. मात्र, स्फोटाचा आवाज अथवा धूर असे काही कमल सेहगल अथवा श्रेया यांनी ऐकले अथवा पाहिले नाही. वॉशरुमच्याजवळ ही वॉशिंग मशीन ठेवली होती. घटनेच्या १५ मिनिट आधी नेहा चोप्रा १०.४५ च्या सुमारास घरातून बाहेर पडल्या होत्या.

दरम्यान, शेजाऱ्यांनी नेहा चोप्रा यांच्या फोनवर अनेक फोन केले. मात्र, त्यांचा फोन सायलेंट मोडवर असल्याने फोन स्वीकारला गेला नाही. काही काळाने चोप्रा यांनी आपला फोन तपासला असता त्यावर शेजाऱ्यांच्या विविध नंबरवरुन अनेक मिसकॉल आल्याचे दिसले. त्यांनी आलेल्या मोबाईल क्रमांकावर परत फोन केला असता त्यांना घटनेबाबत माहिती समजली. (हेही वाचा, अहमदनगर: लष्कराचा बॉम्ब घरी घेऊन गेले, झाला स्फोट; दोघे जागीच ठार)

नेहा चोप्रा यांनी आपल्या घरात प्रवेश केला तेव्हा घरात धूर आणि अंधार पसरला होता. दरम्यान, नेहा यांची भाची रिचा भवानी याच इमारतीत आठव्या मजल्यावर राहते. तिच्याकडे नेहाच्या घराची एक डुप्लीकेट चावी आहे. नेहाच्या फ्लॅटमधून धूर येत असल्याचे पाहताच त्यांनी फ्लॅटकडे धाव घेत कमल सेहगल आणि श्रेया हिला घरातून बाहेर काढले. तर, शेजाऱ्यांनी अग्निशमन दलाला फोन करुन तत्काळ बोलवून घेतले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान काही मिनिटांतच घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आग आटोक्यात आणली. असे वृत्त नेहा चोप्राय यांच्या हवाल्याने मिड डे ने दिले आहे.