मुंबई: चेंबूर येथे कोविड19 ऑफिसर सांगत एका तरुणाकडून लुटले तब्बल 54 हजार रुपये; एकास अटक
प्रतिनिधी हेतूसाठी वापरलेली प्रतिमा  | (Photo Credits: Unsplash)

कोरोना विषाणूने संपूर्ण मुंबईला (Mumbai) हादरून सोडले आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. ज्यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर लोकांना लुटण्याचे अनेक प्रकार उघडकीस आली आहे. यातच चेंबूर (Chembur) येथील सरस्वती विद्यालयाजवळील रस्त्यावर 2 तोतया कोविड19 ऑफिसरांनी एका तरुणाकडून तब्बल 54 हजार रुपयांची लूट केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका जणांना अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे. मुंबईमध्ये कोविड ऑफिसर म्हणून लुबाडण्याची ही पहिली घटना समोर आली आहे. त्यामुळे जर कोणीही स्वतःला कोवीड ऑफिसर म्हणून भेटत असेल तर याची तात्काळ तक्रार संबंधित पोलिस स्टेशनमध्ये करा, असे आवाहनही पोलिसांनी नागरिकांना केले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, अब्दुल शेख हे 30 जून रोजी संध्याकाळी 6 च्या सुमारास चेंबूर येथील सरस्वती विद्यालया समोरून चेंबूर स्टेशनकडे जात असताना त्यांना वाटेत दोन भामटे भेटले होते. त्यांनी स्वतःला कोविड ऑफिसर म्हणून बतावणी करून अब्दुल शेख यांच्याजवळ असलेल्या सामानाची तपासणी केली. अब्दुल शेखजवळ असलेल्या कॅनरा बँकेचे एटीएम घेऊन हातचलाखीने त्याचा पिन नंबर घेऊन अब्दुल शेख यांच्या अकाउंटमधून 54 हजार रुपये काढून घेतले. त्यानंतर अब्दुलने हा सर्वप्रकार चेंबूर पोलीस ठाण्यात सांगितला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी आरोपींचा शोध सुरु केला. सीसीटीव्हीच्या सहाय्याने घटनास्थळी पोलिसांना एक होंडा सिटी गाडी दिसली, याच गाडीमध्ये हे दोन्ही भामटे आले होते. याचा तपास सुरू करत मुंबई पोलीस आरोपी पर्यंत पोहचले. हे देखील वाचा- BMC च्या शताब्दी रुग्णालयात PPE किट न देता तरुणाला स्वतःच्या COVID-19 आईचा मृतदेह उचलण्याची जबरदस्ती; दोन कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

सोहन वाघमारे असे आरोपीचा नाव आहे. चेंबूर पोलिसांनी सोहन वाघमारेला अटक केली असून कलम 420, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला असून पोलिस पुढील तपास करत आहेत तसेच त्याच्या जोडीदाराचा शोधसुद्धा घेत आहेत. सोहन वाघमारे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर आधीसुद्धा सायन पोलीस स्टेशन आणि नेहरूनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.