मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाचे काम ९० टक्के काम पूर्ण झाले असून यावर्षी नोव्हेंबरपासून हा सागरी मार्ग खुला करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. देशातील सर्वात लांबीचा हा सागरी मार्ग ओपन रोड टोलिंग यंत्रणा असलेला देशातील पहिला मार्ग असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पाच्या पॅकेज २ मधील पहिला सर्वात जास्त लांबीचा म्हणजेच सुमारे १८० मीटर लांबीचा आणि सुमारे २३०० मेट्रिक टन वजनाचा ऑर्थोोट्रॉपिक स्टिल डेकची उभारणी करण्यात आली. यावेळी मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मंत्री दादाजी भुसे, संजय राठोड, खासदार राहुल शेवाळे, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त एस व्ही आर श्रीनिवास, अतिरिक्त आयुक्त गोविंदराज आदी उपस्थित होते.
मुंबई ते अलिबाग हे अंतर या सागरी महामार्गामुळे अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे. पर्यावरणपूरक असा हा सागरी महामार्ग असून बांधकामातील जागतीक दर्जाचे तंत्रज्ञान वापरून त्याचे काम करण्यात आले असून या महामार्गावर टोल भरण्यासाठी थांबण्याची आवश्यकता नसणार आहे. ओपन रोड टोलींग यंत्रणा असलेला देशातील पहिला मार्ग ठरणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
संपूर्ण प्रकल्पांतर्गत समुद्रात उभरण्यात येणाऱ्या एकूण ७० ऑर्थोोट्रॉपिक स्टिल डेक (Orthotropic Steel Deck) स्पॅन पैकी एकूण ३६ स्पॅनचीउभारणी पूर्ण झाली आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत मुंबई ट्रांस हर्बर लिंक (MTHL) या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर असून प्रकल्पाची स्थापत्य कामे सुमारे ९० टक्के पूर्ण झाले आहे. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) हा मुंबई शहरातील शिवडी व मुख्य भूमीवरील न्हावा यांना जोडणारा सुमारे २२ किमी लांबीच्या ६ पदरी (३+३ मार्गिका) पूल आहे. या पुलाची समुद्रातील लांबी सुमारे १६.५ किमी असून जमिनीवरील पुलाची एकूण लांबी सुमारे ५.५ किमी इतकी आहे. (हेही वाचा: महाराष्ट्रातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! लवकरच होणार पगारवाढ, CM Eknath Shinde यांनी स्वीकारला राज्य वेतन सुधारणा समितीचा अहवाल)
मुख्य पुलाची रचना ही ६० मीटर लांबीच्या स्पॅनची असून मुख्यतः ते सेगमेंटल बॉक्स गर्डर व कॉक्रिट डेक आहेत. मुंबई पारबंदर प्रकल्पाचे एक प्रमुख वैशिष्ट्य असलेला हा सागरी क्षेत्रातील नॅव्हिगेशन भागातील स्टील डेक आहे. ज्याला तांत्रिकदृष्ट्या ऑर्थोट्रॉपिक स्टील डेक (OSD) असे म्हणतात. समुद्रातील जहाजांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी मोठ्या लांबीचे हे स्पॅन समुद्राच्या पाण्याच्या पातळीपासून सुमारे २५ मीटर उंच बांधण्यात येत आहेत. त्यामुळे हा स्पॅन नेव्हिगेशनल स्पॅन म्हणून ओळखला जातो. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पॅकेज २ मधील एकूण ३२ ओएसडी स्पॅनपैकी १५ ओएसडी स्पॅन आधीच स्थापित केले गेले आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत १८० मीटरचा हा पॅकेज २ मधील सर्वात लांब ओएसडी स्पॅन स्थापित करण्यात आला.