मुंबईमध्ये आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली होती. दहिसर, मुलुंड चेक नाका, कांदिवली वेस्टर्न एक्सप्रेस मार्ग या ठिकाणी वाहनांच्या लांब रांगा लागल्या होत्या. आता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) आज दुपारी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या काही भाग कोसळल्यामुळे वांद्रे येथील टर्नर रोड जंक्शन (Turner Road Junction) आणि एसव्ही रोड, बांद्रा हा मार्ग ठप्प झाला आहे. त्यामुळे सांताक्रूझच्या (Santacruz) दिशेने जाणाऱ्या नागरिकांनी लिंक रोडचा (Link Road) वापर करावा अशी विनंती केली गेली आहे.
याबाबत मुंबई पोलिसांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. यामध्ये ते म्हणतात. ‘इमारतीच्या छताचा भाग कोसळल्याने टर्नर रोड जंक्शन आणि एसव्ही रोड, बांद्रा या परिसर ठप्प झाल्याने, इथली वाहतूक वळवण्यात आली आहे. तरी सांताक्रूझला जाणाऱ्या लोकांना लिंक रोडचा वापर करा. सांताक्रूझकडे जाणाऱ्या 4L, 33, 84L, 201, 202L या नंबरच्या बसेस, खार एमसीजीएम हॉस्पिटल वरून खार स्टेशन रोड व एसव्ही रोडकडे वळविल्या जात आहेत.’ (हेही वाचा: महाराष्ट्रात 31 जुलै पर्यंत लॉकडाऊन वाढवला, राज्य सरकारची मोठी घोषणा)
पहा मुंबई पोलीस ट्वीट -
Traffic diversion at Turner Road Jn, S.V Road due to the fall of a building slab.
Those heading towards S'Cruz are requested to use Link Road.
Bus Nos 4L, 33, 84L, 201, 202L, plying towards S'Cruz are diverted from Khar MCGM Hosp via Khar Stn Rd & back to SV Road.
— Mumbai Police (@MumbaiPolice) June 29, 2020
मुंबई मिररच्या वृत्तानुसार, सोमवारी पहाटेच्या सुमारास तीन मजली इमारतीच्या पायऱ्या आणि छताचा काही भाग कोसळला. प्राथमिक माहितीनुसार ही इमारत एसव्ही रोडवरील खार मशिदीच्या शेजारील पोकोलोको बार (Pokoloko Bar) जवळ एचपी पेट्रोल पंप समोरील आहे. दरम्यान, आज वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरही सोमवारी सकाळपासूनच प्रचंड रहदारी ठप्प झाली आहे. सरकारने लॉक डाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आणल्याने अनेक कार्यालये सुरु झाली आहेत. तसेच आता कोरोना व्हायरसच्या वाढत्या घटना पाहता, मुंबई पोलिसांनी आपल्या परिसराच्या 2 किमी पेक्षा जास्त अनातारावर गाडी चालवण्यास बंदी घातली आहे.