Mumbai Tata Hospital (संग्रहित संपादित प्रतिमा)

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील टाटा रुग्णालय (Tata Hospital) हे देशातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध आहे. या ठिकाणी देश-विदेशातून लोक कॅन्सरच्या उपचारासाठी (Cancer Treatment) येतात. त्यातील बहुतांश रुग्ण हे गरीब असतात. आता या रुग्णालयातील डायग्नोस्टिक स्कॅन रॅकेटचा पोलिसांनी भांडाफोड केला आहे.

रुग्णालयात कॅन्सरच्या उपचारासाठी डॉक्टरांकडून अनेक प्रकारच्या चाचण्या लिहून दिल्या जातात, मात्र खासगी डायग्नोस्टिक सेंटरचा फायदा व्हावा यासाठी टाटाचे काही कर्मचारी त्या रुग्णाला खासगी डायग्नोस्टिक सेंटरमधून डॉक्टरांनी लिहून दिलेल्या टेस्ट करून घेण्याचा सल्ला देत असत.

या प्रकरणी टाटा हॉस्पिटलच्या 21 कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या चाचण्या टाटामध्ये केल्या जात नाहीत किंवा टाटामध्ये चाचणी केल्यास अहवाल येण्यास काही दिवस लागतील, त्यामुळे उपचाराला उशीर होऊ शकतो, असे सांगत कर्मचारी रुग्णांना खासगी डायग्नोस्टिक सेंटरमध्ये पाठवत असत.

टाटा येथे आलेल्या रुग्णांना खासगी निदान केंद्रात उपचार घेण्यास सांगून खासगी डायग्नोस्टिक सेंटरला फायदा करवून, सरकारचे लाखो रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी 21 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांनी यातील 11 जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 21 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, तर मुंबई पोलीस इतर लोकांचा शोध घेत आहेत. (हेही वाचा: Aapla Dawakhana: राज्यात लवकरच 700 ठिकाणी सुरु होणार हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना; निधी मंजूर, लाभार्थ्यांना मोफत मिळणार आरोग्य सेवा)

मुंबई पोलिसांनी आयपीसीच्या कलम 409, 406, 420 आणि 120 बी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुंबई पोलिसांचे डीसीपी प्रशांत कदम यांच्या आदेशानुसार भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुभाष बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक पंकज घाडगे, पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत मैत्रे, अमित कदम यांच्या पथकाकडून या प्रकरणाचा छडा लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.