Mumbai Crime News: मुंबई येथील एका महाविद्यालयीन तरुणाने मित्रांसोबत मस्करी करताना दाखवलेला निष्काळजीपणा एका चिमुकल्या मुलीसाठी जीवघेणा (Child Death) ठरला आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) या घटनेची तातडीने दखल घेतली आणि सदर तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. हर्षद गौरव (Harshad Gaurav) असे या मुलाचे नाव असून, तो 20 वर्षांचा आहे. ही घटना 2 जानेवारी रोजी जुहूच्या अमृतलालवाडी परिसरात घडली. हर्षद हा मित्रांसोबत दंगामस्ती करत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो अवघ्या दोन वर्षांची असलेल्या विधी अग्रहारी हिच्या अंगावर पडला. अंगावर चुकून पडलेल्या तरुणामुळे विधी ही मुलगी गंभीर जखमी झाली. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात वैद्यकीय उपचार घेत असताना तिचा मृत्यू झाला.
काय घडले नेमके?
पीडित विधी हिचे वडील विनय अग्रहारी यांनी मुंबई पोलीसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, विनय हे स्वत:च्या मालकीचे किराणा दुकान चालवतात. घटना घडली तेव्हा त्यांची कन्या विधी ही दुकानाजवळच खेळत होती. याच वेळी हर्षद गौरव आणि त्याचा मित्र शहानवाझ अन्सारी हे दोघे तिथे आले. दोघांमध्ये दंगामस्ती सुरु होती. ज्यामध्ये दोघेही एकमेकांना ढकलाढकली करत होते. दरम्यान, त्यांचा दंगा वाढला असता विधीच्या आईने दोघांनाही लहान मुलाजवळ खेळू नका. थोडे दूर जाऊन तुम्हाला जी काही मस्ती करायची ती करा, असे सांगितले. परंतू, वारंवार सूचना देऊनही दोघांनीही मुलीच्या आईचे ऐकले नाही. विधीच्या आईच्या सूचनांकडे दूर्लक्ष करत ते लहान बाळाजवळच खेळू लागले. (हेही वाचा, Bhayandar News: आईचे दुसरे लग्न, 8 वर्षांचा मुलगा अनाथाश्रमात; विहिरीत उडी मारुन आत्महत्या)
तोल गेला आणि अनर्थ घडला
दरम्यान, हर्षद आणि शहानवाझ यांच्यातील मस्ती अधिकच वाढली. त्यांनी एकमेकांना जोराद ढकलण्यास सुरुवात केली. त्यातच हर्षद याने स्वत:वरील नियंत्रण गमावले आणि त्याचा तोल गेला. तो वय वर्षे अवघे 2 असलेल्या विधी हिच्या अंगावर पडला. ज्यामुळे तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तिच्या नाकातून रक्तस्त्राव सुरु झाला आणि ती जागीच कोसळली. पालक आणि स्थानिकांसह स्वतः गौरव यांनी तिला कूपर रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय उपचार सुरु असताना दोन दिवसांनंतर, 4 जानेवारी रोजी तिचा मृत्यू झाला. मुंबईत गुन्हा घडलेले हे प्रकरण दुर्मिळ मानले जात आहे. (हेही वाचा, Kidnaping Over Mobile Phone Dispute: मोबाईल फोनवरुन वाद,अल्पवयीन मुलाचे अपहरण, ₹33,000 च्या खंडणीची मागणी; मालाड येथून चौघांना अटक)
मुंबई पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 106 सह संबंधित कलमांखाली गौरव विरोधात गुन्हा दाखल केला आहे. जो निष्काळजीपणामुळे मृत्यूशी संबंधित आहे. गौरवला चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकरणाच्या पोलीस तपासाचा एक भाग असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले, प्रथमदर्शनी तरी ही घटना एक दुर्दैवी अपघात असल्याचे दिसते. असे असले तरी आरोपीचा निष्काळजीपणाही पुढे येत आहे. त्यामुळे तपास सुरु असून कायदेशीर प्रक्रिया राबवली जात आहे.
दरम्यान, या घटनेनंतर स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. केवळ एखाद्या व्यक्तीच्या निष्काळजीपणामुळे चिमुकलीला प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे या तरुणावर कायदेशीर कारवाई कडकपणे करायला हवी, अशी मागणी पीडित पालक आणि स्थानिक करत आहेत. पोलिसांनी पीडित कुटुंबास न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे म्हटले आहे.