मुंबईत भटक्या कुत्र्यांचा काळाबाजार, रंग लावून विकले जात असल्याचा प्रकार उघडकीस
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

मुंबईतील (Mumbai) रस्त्यांवरील भटक्या कुत्र्यांची (Street Dogs) संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भटके कुत्रे ही काही वेळा आक्रमक होत नागरिकांना दुखापत करत असल्याचे प्रकारसुद्धा समोर आले आहेत. त्यामुळे भटक्या कुत्र्यांना पकडण्यासाठी पालिकेकडून प्रयत्न केले जातात. परंतु मुंबईत सध्या भटक्या कुत्र्यांच्याबाबत एक धक्कादायक बाब उघडकीस आली असून त्यांचा काळाबाजार होत आहे.

रस्त्यांवरील भटक्या कुत्र्यांच्या पिल्लांना रंग लावून ती एका विशिष्ठ जातीचे असल्याचे नागरिकांना भासवले जाते. त्यानंतर फक्त 500 रुपयात खरेदी केलेल्या या कुत्र्यांच्या पिल्लांना पक्का रंग लावून त्याची 10 हजार रुपयात विक्री केली जात असल्याची गोष्ट उघडकीस आली आहे. तर रविवारी बॉम्बे अॅनिमल राईट्स या संघटनेने या भटक्या कुत्र्यांच्या बाबतचा काळाबाजार समोर आणला आहे.

(मुंबईकरांनो कचरा केल्यास अतिरिक्त कर भरावा लागेल, महापालिका कारवाई करण्याच्या तयारीत)

कुत्र्यांच्या पिल्लांना 500 रुपयात विकत घेऊन त्यांना पक्का काळा रंग लावण्यात आला. त्यानंतर बिगेल जातीचे हे कुत्रे असल्याची बातावणी करत त्यांची चक्क 10 हजार रुपयांत विक्री करण्यात आली आहे. परंतु मूळ बिगेल जातीच्या कुत्र्यांची किंमत ही 25 हजार रुपयांपर्यंत आहे. त्याचसोबत बिगेल जातीचे भासवण्यासाठी त्यांचे कानसुद्धा कापण्यात येणार असल्याची तयारी चोरट्यांनी केली होती. परंतु कुत्रे खरेदी करणाऱ्यांना हे बिगेल जातीचे नसल्याचा संशय आल्याने त्यांनी अॅनिमल राईट्स संघटनेसोबत संपर्क साधत ही बाब समोर आणली आहे.