Mumbai: सोसायटी रहिवाशांनी रेस्टॉरंटला पुरवले कबुतराचे मांस; पुढे ग्राहकांना चिकन म्हणून विकले, 8 जणांवर गुन्हा दाखल
A Pigeon | Representative Image | (Photo Credits: Wikipedia)

खाद्यपदार्थांमध्ये भेसळीची अनेक प्रकरणे वेळोवेळी समोर आली आहेत. आता तर परिस्थिती अशी आहे की, रेस्टॉरंटमधील पदार्थांवरही लोकांचा विश्वास राहिला नाही. अशात मुंबईतील (Mumbai) एका रहिवाशाने चक्क कबूतर (Pigeon) मारून त्याचे मांस जवळच्या रेस्टॉरंटमध्ये विकल्याची बाब समोर आली आहे. या घटनेप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी अभिषेक सावंत आणि माटुंगा पूर्वेकडील किंग्ज सर्कल येथील नरोत्तम निवास सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या गृहनिर्माण समितीच्या सात सदस्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई पोलिसांना मिळालेल्या तक्रारीनुसार, सावंत या वर्षी मार्च महिन्यापासून अपार्टमेंटच्या टेरेसवर पिंजऱ्यात कबुतर पाळत होता. त्यानंतर हे पक्षी मोठे झाल्यावर त्यांना मारून त्यांचे मांस हाऊसिंग सोसायटीच्या अगदी खाली असलेल्या हॉटेल आणि बिअर पार्लरला विकले जात होते. त्यानंतर हे मांस कोंबडीचे मांस म्हणून ग्राहकांना दिले जात असे. महत्वाच्या म्हणजे अपार्टमेंटच्या पदाधिकाऱ्यांना सावंतच्या कारवायांची माहिती होती, मात्र त्यांनी मौन बाळगल्याचे पोलिसांनी सांगितले.

त्याच अपार्टमेंटमध्ये राहणारे 71 वर्षीय सेवानिवृत्त लष्करी जवान हरेश गगलानी यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर, सावंत आणि इतरांवर अनेक आयपीसी कलमांसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आठ जणांमध्ये एका राजकारण्याच्या मुलाचा समावेश आहे. इमारतीच्या छतावर कबुतप पाळून ती काही हॉटेलांना पुरवली जातात अशी तक्रार गगलानी यांनी पोलिसांकडे केली होती. (हेही वाचा: Mumbai Measles Outbreak: मुंबईत गोवर संसर्गाचे आव्हान कायम, 11 नवे रुग्ण; एका संशयित मृत्यू)

दुसरीकडे, गगलानी यांनी केलेले आरोप गृहनिर्माण संस्थेच्या सदस्यांनी फेटाळून लावले आहे. त्यांनी दावा केला की, गगलानी अनेक दिवसांपासून असे खोटे आणि निराधार आरोप करत आहेत. त्यांनी आतापर्यंत 34 खटले दाखल केले आहेत आणि त्याचे पुढे काहीही झाले नाही. आताही कबुतराचे मांस प्रकरणी चौकशी होऊन सत्य बाहेर येऊ द्या, असे गृहनिर्माण संस्थेच्या एका सदस्याने सांगितले.

दरम्यान, हॉटेल मालकानेही हे दावे फेटाळून लावले आहेत. पण, तक्रार दाखल करताना गगलानी यांनी काही फोटो पोलिसांना दिले आहेत. त्यांनी न्संगीतले की, अभिषेक सावंत आपल्या ड्रायव्हरच्या मदतीने कबुतरांचे मांस हॉटेलांना विकत आहे.