सायन उड्डाणपूल (Photo Credits: Twitter/@yogendra73)

ठाणे, नवी मुंबई, पुणे येथून मुंबईत प्रवेश करणाऱ्यांसाठी सायन उड्डाणपूल (Sion Flyover)  फायदेशीर आहे. मात्र काही दिवसांपूर्वी या पूलाच्या कठड्याच्या प्लॅस्टिकचा भाग कोसल्यानानंतर आता हा पूल 20 एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा (MSRDC) च्या अख्यारीत असलेल्या सायन पुलाचे दुरुस्तीचे काम मागील अनेक महिन्यांपासून प्रलंबित होते. 'आयआयटी मुंबई'कडून स्टक्चरल ऑडिट झाल्यानंतर या पुलावर बेअरिंग (सांधे) बदलण्याची शिफारस देण्यात आली होती.

मुंबईत मागील वर्षभरापासून सुरु असलेल्या पूल अपघातानंतर तात्काळ मुंबईतील उड्डाणपूल आणि रेल्वे स्थानकावरील पादचारी पुलाची तपासणी करण्यात आली आहे. त्यानुसार सायनच्या उड्डाणपुलावर १७० बेअरिंग नादुरुस्त आहेत ते बदलण्यात येतील. या कामासाठी 20 एप्रिल पासून पुढील 2 महिने सायन उड्डाणपूल बंद ठेवला जाणार आहे. गुरुवारी (28 मार्च) दिवशी पूलाचा प्लॅस्टिकचा भाग कोसळल्यानंतर सध्या जड वाहनांना पूलावर प्रवेशबंदी आहे. मात्र 20 एप्रिल पासून हा पूल पूर्णपणे बंद ठेवला जाणार आहे.

स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्टच्या अहवालानुसार, सायन पुलाच्या दुरुस्तीसाठी डिसेंबर 2018 पासून बंद ठेवला जाणार होता मात्र आता वाहतूक कोंडीमुळे त्याचं काम पुढे ढकलण्यात आलं होतं. काही आठवड्यापूर्वी सीएसएमटी परिसरात पुलाचा भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. सहा बळी घेतल्यानंतर आता प्रशासनाने आता पुन्हा पुलांची पाहणी करायला सुरुवात केली आहे.