गेल्या काही आठवड्यांपूर्वी मुंबईच्या (Mumbai) प्रसिद्ध श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टवर (Siddhivinayak Temple Trust) अनेक प्रकारचे आरोप झाले होते. कोरोनाच्या काळात मंदिराला मिळालेले 15 हजार लिटर तूप ट्रस्टने विकल्याचा सर्वात मोठा आरोप होता. या आरोपानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी केली जाईल असे सांगितले होते. आता श्री सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने कारभारामधील अनियमितता आणि भ्रष्टाचाराचे आरोप फेटाळून लावले आहेत.
ट्रस्टचे प्रमुख आदेश बांदेकर म्हणाले की, आंतरराष्ट्रीय स्तरावर सोशल मीडियावर मंदिराची बदनामी करणाऱ्या सर्वांवर मानहानीचा खटला दाखल करणार आहे. काल याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्रोटक माहितीच्या आधारे मंदिराची बदनामी करणाऱ्यांवर मानहानीचा खटला दाखल करू, असा ठराव संमत केला गेला आहे.
सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत आदेश बांदेकर बोलत होते. ते म्हणाले, ‘मंदिरातील सर्व व्यवहार ई-टेंडर पद्धतीने केले जातात. सर्वात कमी बोली लावणाऱ्यांनाच काम दिले जाते. नियमानुसार काम करूनही मंदिर ट्रस्टची बदनामी होत असल्याने विश्वस्त मंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे.‘ या चौकशीची माहिती लोकांसमोर आल्यावर सत्य समोर येईल, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, ‘आमचा मंदिर ट्रस्ट महाराष्ट्र सरकारच्या कायदा आणि न्याय विभागाच्या अंतर्गत येतो. आम्ही वेगळ्या कायद्यांतर्गत आहोत त्यामुळे आम्ही घेतलेल्या निर्णयाबद्दल वेळोवेळी त्यांना लिहित आहोत. ज्यांनी आमची बदनामी केली त्यांची यादी आम्ही अजून तयार केलेली नाही. हा फौजदारी मानहानीचा खटला असल्याने पोलिसांनाही यात लक्ष घालण्यास सांगितले जाईल. ही एक कायदेशीर प्रक्रिया आहे ज्याचे पालन करावे लागेल.’ (हेही वाचा: पात्र रहिवाशांना मिळणार 300 चौरस फूट कार्पेट एरियासह अनेक सुविधा, जाणून घ्या सविस्तर)
तूप विक्रीच्या आरोपांबाबत ते म्हणाले, ‘साजूक तूप घोटाळ्यातही तुपाची परस्पर विक्री झाली नाही. 8 मार्चला तूप आले आणि त्यानंतर 23 मार्चला लॉकडाऊनमुळे 55 तीर्थक्षेत्रांना हे तूप मोफत वाटण्यात आले.’ शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाशी संबंधित असलेले बांदेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने केलेल्या आरोपांचे खंडन करत होते, ज्यात सदा सरवणकर यांचा समावेश होता.