आतापर्यंत आपण महिलांवरील लैंगिक अत्याचाराची (Sexual Assault) अनेक प्रकरणे ऐकली असतील. मात्र आता मुंबईमध्ये (Mumbai) एका पुरुषावर अतिशय घृणास्पद पद्धतीने लैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणात, मुलुंड पोलिसांनी सोमवारी एका 34 वर्षीय व्यक्तीला अटक केली. महत्वाचे म्हणजे हे लैंगिक अत्याचार या पुरुषाच्या समलिंगी जोडीदाराने केले आहेत. या जोडीदाराने पिडीतेच्या खाजगी भागाला जळत्या मेणबत्तीने तसेच प्लास्टिकच्या रॉडने दुखापत केली आहे. मुलुंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा गुन्हा 6 जुलै रोजी मुलुंड कॉलनीतील हिंदुस्थान चौकातील निर्जन गोडाऊनमध्ये झाला होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांतीलाल कोथिंबिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘चौकशीनुसार पीडित आणि आरोपीचे गेल्या काही महिन्यांपासून संबंध होते. आरोपी सुरेश म्हस्के याने 33 वर्षीय पीडितेला फोन करून घटनास्थळी भेटण्यास सांगितले. पीडित तरुण तेथे आल्यानंतर म्हस्के याने त्याच्याकडे असलेल्या थकीत पैशांची मागणी केली. यावरून दोघांमध्ये मोठा वाद झाला. त्यानंतर मद्यधुंद अवस्थेत असलेल्या म्हस्के याने पीडित तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली.’
म्हस्के इथेच थांबला नाही, तर त्याने पेटती मेणबत्ती आणि गोदामात पडलेल्या प्लास्टिकच्या रॉडचा वापर करून पिडीतेच्या प्रायव्हेट पार्टला जखमा केल्या. त्यानंतर म्हस्केने पीडित तरुणाला घटनास्थळी तसेच सोडले व तो निघून गेला. म्हस्के तिथून बाहेर पडल्यानंतर पिडीत तरुण जवळच्या रुग्णालयात गेला. त्यानंतर त्याला सायन रुग्णालयात हलवण्यात आले. इथे डॉक्टरांनी पोलिसांना प्रकरणाची माहिती दिली. (हेही वाचा: खोट्या लोन रिकव्हरी एजंटकडून तरुणाचा मानसिक छळ; बलात्कारी म्हणून हिणवले, 35 लोकांना पाठवले मॉर्फ केलेले फोटो)
त्यानंतर पोलिसांनी एक पथक रुग्णालयात पाठवून पीडित तरुणाचा जबाब नोंदवला, त्याआधारे म्हस्केविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर सोमवारी रात्री उशिरा त्याचा शोध घेऊन अटक करण्यात आली. पोलिसांनी म्हस्के यांच्यावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार, धोकादायक शस्त्रे किंवा साधनांनी गंभीर दुखापत करणे आणि गुन्हेगारी धमकी देणे या प्रकरणी आयपीसी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.