मुंबईत गुन्हेगारीच्या (Mumbai Crime) घटनेत चांगलीच वाढ झाली आहे आणि पोलिसांचा (Mumbai Police) देखील गुन्हेगारांवर काही वचक नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे.
प्रेमसबंध ठेवण्यास प्रेयसीने नकार दिल्याने संतापलेल्या तरूणाने त्याच्या प्रेयसीवर चालत्या रिक्षात चाकूने वार केल्याची घटना भांडुप येथे घडली. याबाबत भांडुप पोलिसांनी (Bhandup) तरुणाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. चेतन गायकवाड असे या 27 वर्षीय आरोपी तरुणाचे नाव असून तो भांडुपच्या टेंभीपाडा परिसरातील राहणारा आहे. याच परिसरात राहणाऱ्या एका 21 वर्षीय तरुणाशी त्याचे अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. (हेही वाचा - Palghar: देवदर्शनाला गेला पण काळाने घाला घातला! पालघरमधील जीवदानी मंदिरात जाताना हृदयविकाराच्या झटक्याने 41 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू)
चेतन गायकवाड आणि या तरुणीचे गेल्या अनेक दिवसांपासून प्रेम संबध होते. मात्र प्रेयसीने काही दिवसांपूर्वी अचानक त्याच्यापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. संतापलेल्या चेतनने तिला 12 ऑक्टोबरला एका कॅफेमध्ये भेटण्यासाठी बोलावले होते. तेथे दोघांमध्ये वाद झाल्याने तरुणी तिच्या घरी निघून गेली. त्यानंतर 14 ऑक्टोबरला पुन्हा त्याने तिला भेटण्यासाठी बोलावले. त्यानंतर दोघेही अंधेरी परिसरात गेले होते. अंधेरी येथून परतत असताना रिक्षातच चेतनने तरुणीकडे लग्नासाठी तगादा लावला. मात्र तिने यापुढे प्रेमसंबंधच ठेवण्यास नकार दिला. यावेळी आरोपी तरुणाने त्याच्याकडे असलेल्या चाकूने तरुणीच्या मानेवर वार केले.
चेतन गायकवाडच्या हल्ल्यात सदर तरुणी गंभीर जखमी झाली. आरोपी तिला तसचे सोडून निघून गेला. तरुणीने तत्काळ भांडुप पोलीस ठाणे गाठले. तेथे असलेल्या पोलिसांनी तिला राजावाडी रुग्णालयात दाखल करून गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तर आरोपीला अटक केली आहे.