Bank Robbery Mumbai: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) च्या मुंबई शाखेतून तब्बल 3 कोटी रुपये किमतीचे 4 किलो सोने गायब (Gold Theft) झाल्याचा धक्कादायक प्रकार उघकीस आला आहे. बँक लॉकरमध्ये सुरक्षीत ठेवलेल्या सोन्यावर बँक कर्मचाऱ्यानेच डल्ला मारल्याची प्राथमिक माहिती आहे. हा प्रकार मुंबई मुलुंड पश्चिम येथील SBI च्या पर्सनल बँकिंग शाखेत घडला. मुख्य संशयित, 33 वर्षीय सेवा व्यवस्थापक मनोज मारुती म्हस्के याने बँकेच्या लॉकरमधून सुमारे 4 किलो सोन्याचे दागिने चोरल्याचा आरोप आहे. मालाड पूर्व येथील रहेजा टाऊनशिपमध्ये राहणारा आणि मूळचा मराठवाड्यातील नांदेडचा राहणारा म्हस्के, त्याच्या ताब्यातील चावी घेऊन लॉकरमध्ये प्रवेश करण्यात यशस्वी झाला.
सोन्याच्या दागिन्यांची अनेक पॅकेट गायब
बँकेचा लॉकर उघडण्यासाठी दोन चाव्या आवश्यक असतात. त्यापैकी एक म्हस्के याच्याकडे होती आणि दुसरी चावी शाखेतील कॅश इन्चार्ज स्वेता सोहनी यांच्याकडे होती. पोलीस अधिकाऱ्याने स्पष्ट केले, "जेव्हा ग्राहक सोन्याच्या कर्जासाठी अर्ज करतो, तेव्हा सोन्याची सत्यता पडताळल्यानंतर ते लॉकरमध्ये साठवले जाते आणि सोन्याच्या किमतीच्या 65% कर्ज दिले जाते." मुलुंड शाखेचे प्रशासक अमित कुमार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरु केला. दरम्यान, पोलीस तपासात लक्षात आले की, म्हस्के रजेवर असताना 27 फेब्रुवारी रोजी चोरीचा प्रकार उघडकीस आला. म्हस्केच्या रजेच्या दिवशी लॉकर सांभाळत असलेल्या कुमारच्या लक्षात आले की सोन्याच्या दागिन्यांची अनेक पॅकेट गायब आहेत. तपासणी केली असता लॉकरमध्ये सोन्याच्या कर्जाच्या 63 पैकी फक्त चार पाकिटे शिल्लक असल्याचे आढळले. (हेही वाचा, SBI Hikes Deposit Rates: स्टेट बँक ऑफ इंडिया मुदत ठेव व्याजदरात वाढ; घ्या जाणून)
सोने चोरुन शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक
हरवलेल्या सोन्याबाबत कुमार यांनी म्हस्के यांच्याशी संपर्क साधला असता, म्हस्के यांनी सोने वैयक्तिक वापरासाठी घेतल्याचे कबूल केले आणि त्यांनी ते गहाण ठेवले आणि विकल्याचे सांगितले, परंतु आठवडाभरात ते परत करण्याचे आश्वासन दिले. सार्वजनिक सेवक किंवा बँकरकडून विश्वासघात केल्याप्रकरणी पोलिसांनी 1 मार्च रोजी भारतीय दंड संहितेच्या कलम 409 अंतर्गत म्हस्के यांना अटक झाली. म्हस्के यांना चोरीचे सोने विकण्यास मदत केल्याप्रकरणी अँटॉप हिल येथील 48 वर्षीय साडी दुकान मालक फरीद शेख याला 2 मार्च रोजी अटक करण्यात आली होती. शेखने दागिन्यांच्या दुकानात एक किलो सोने गहाण ठेवले होते. म्हस्के व शेख या दोघांना न्यायालयात हजर केले असता ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, या धक्कादायक प्रकाराची शहरात जोरदार चर्चा सुरु आहे.