राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यांशी दादर स्थानकामध्ये बेशिस्त वर्तन करणारा टॅक्सी चालक कुलजीत सिंह मल्होत्रा (Kuljit Singh Malhotra ) याला अटक करण्यात आली आहे. काल (12 सप्टेंबर) दादर स्टेशनमध्ये रेल्वे डब्ब्यात घुसून प्रवाशांसोबत हुज्जत घालणार्या कुलजितसोबत घडलेला सारा प्रकार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत सांगितला. त्यानंतर रेल्वे मंत्रालयाकडे तक्रार करत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यानुसार स्थानकावर उपलब्ध RPF जवानांनी कुलजित सिंग मल्होत्रा याला दंड ठोठावला. मात्र त्यानंतर आज या टॅक्सी चालकाला अटक करण्यात आली आहे.
TOI ने दिलेल्या वृत्तानुसार, आज कुलजित सिंह मल्होत्राला अटक करण्यात आली आहे. काल खासदार देवगिरी एक्सप्रेसने मुंबईमध्ये दाखल झाल्या. दादर स्थानकामध्ये गाडी थांबल्यानंतर कुलजित थेट डब्ब्यात घुसला. प्रवाशांसोबत हुज्जत घातल्यानंतर त्याने सुप्रिया सुळे यांचीदेखील वाट रोखली. त्याला हटकल्यानंतरही तो जबरदस्तीने सुप्रिया सुळेंसोबत सेल्फी काढण्याचा प्रयत्न करत होता. हा सारा प्रकार सुप्रिया सुळे यांनी ट्वीटरच्या माध्यामातून सांगितला आहे. तसेच कोणत्याही टॅक्सी चालकाने/ दलालाने रेल्वे स्थानक अथवा विमानतळांच्या आत न जाता त्यांना टॅक्सी स्टँडमध्येच राहण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी देखील सुप्रिया सुळे यांनी ट्वीटरच्या माध्यमातून केली आहे .मुंबई: सुप्रिया सुळे यांच्यासोबत दादर रेल्वे स्थानकांत टॅक्सी चालकाचं बेशिस्त वर्तन; RPF ने दंड ठोठावत केली कारवाई
विनातिकीट दादर स्थानकात आलेला टॅक्सी चालक कुलजित सिंह मल्होत्रा याला रेल्वेने 260 रुपयांचा दंड ठोठावला. सोबतच माटुंगा वाहतूक पोलिसांनीही त्याला युनिफॉर्म न घातल्याने, तसेच परवाना नसल्याने 600 रुपयांचा दंड ठोठावला. भारतीय रेल्वे कायद्यांतर्गत दादर आरपीएफने त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करत त्याची रवानगी आरपीएफ कोठडीत केली, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी TOI ला दिली आहे.