Mumbai Rains Updates: मुंबईत अनेक ठिकाणी पाणीच पाणी, रस्त्यांवर वाहतूक कोंडी, सीएसएमटी ते टिटवाळा रेल्वे वाहतूक सुरु
Rains | (Photo Credits: ANI)

मुंबईतील मुसळधार पाऊस विश्रांती घेऊन कोसळतोच आहे. बुधवारी आणि गुरुवारी (121,22 जुलै) पडलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई (Mumbai Rains Updates) शहरात सकल भागात पाणी तर साचले. परंतू, रेल्वे रुळ आणि फलाटांवरही पाणी साचल्याचे पाहायला मिळाले. सकल भागांतील रस्त्यांवरही पाणीच पाणी चोहीकडे अशी स्थिती होती. मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. मध्यरात्रीपासून सुरु झालेला मध्यम ते जोरदार पाऊस अद्यापही सुरु आहे. उंबरमाळी रेल्वे स्थानकात रेल्वे रुळांसह फलाटांवरही पाणी पाहायला मिळाले. त्यामुळे याठिकाणी अप-डाऊन अशा दोन्ही मार्गांवरील वाहतूक ठप्प झाली.

उंबरमाळी रेल्वे स्थानक आणि कसारादरम्यान वाहतूक मुसळधार पावसामुळे ठप्प आहे. याशिवाय खर्डीदरम्यानची रेल्वे वाहतूक ठप्प आहे. ही वाहतूक रेल्वेरुळांवर पाणी साचल्याने आणि घाट परिसरात दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प आहे. (हेही वाचा, China Floods: चीनमध्ये गेल्या 1000 वर्षातील सर्वात मुसळधार पाऊस; लाखो लोक स्थलांतरीत, Apple City बुडाली)

दरम्यान, रस्ते मार्गांवरही अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. त्यामुळे मुंबईत मालाड-जोगेश्वरीमध्ये अनेक ठिकणी सखल भागांमध्ये पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहे. पूर्व द्रुतगतीमार्ग आणि विलेपार्ले वांद्रे पट्यामध्येही अनेक ठिकाणं जलमय झाली आहेत. पूर्व द्रुतगतीमार्गावर भांडूप ते मुलुंडदरम्यानही वाहतूक ठप्प आहे. रस्त्यांवरील खड्डे आणि जलमय रस्ते यांमुळे वाहतुकीला फटका बसला आहे. अर्थातच वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे.

विक्रमी पावसाची नोंद

मुंबई आणि उपनगरांमध्ये अनेक ठिकाणी विक्रमी पावसाची नोंद झाली. मध्यरात्री झालेली पावसाची नोंद खालील प्रमाणे.

जुलै महिन्यातील मुंबईतील पावसाची सरासरी नोंद- 840 मिमी

सांताक्रूझ- 1032.2 मिमी पाऊस (1 जुलै ते 21 जुलै या कालावधीत)

कुलाबा- 761.6 मिमी मिमी पाऊस (1 जुलै ते 21 जुलै या कालावधीत)

मुंबईतील धरणांचा पाणीसाठी वाढला

दरम्यान, मुंबई शहरात संततधार पडत असलेल्या पावसामुळे दयनीय स्थिती निर्माण झाली असली तरी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात म्हणावा तसा पाऊस पडत नव्हता. त्यामुळे चिंता वाढली होती. परंतू, ताज्या माहितीनुसार, धरण परिसरात चांगलाच पाऊस पडत आहे. त्यामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाण्याची पातळी चांगलीच वाढली आहे.