Mumbai Rains: मुंबईच्या पावसात अडकलेल्यांसाठी आदेश बांदेकर यांनी केले आवाहन; सिद्धिविनायक मंदिराकडून जेवण्याची, राहण्याची सोय
Siddhivinayak Temple (Photo Credits : commons.wikimedia)

मुंबई आणि जवळपासच्या शहरात मागील काही दिवसांपासून पावसाने गणेश चतुर्थीचा मुहूर्त साधत पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केले. मुंबई, उपनगर, ठाणे, नवी मुंबईसह वसईसह भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढले. सतत पडणाऱ्या पावसामुळे दीड दिवसाच्या गणपतींच्या विसर्जनाला फटका देखील बसला. बुधवारी देखील पावसाचा जोर काही कमी झाला नाही. दोन दिवसांपासून सतत पावसाची संततधार सुरू आसल्याने मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह जवळपासच्या भागात पाणी साचले. याचा परिणाम गणेश मंडळांना देखील झाला. दोन दिवसांपासून सतत पावसाची संततधार सुरू आसल्याने ठिकठिकाणी गणेश मंडळात पाणी शिरले.

या प्रसंगी मुंबईचे प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर पावसामुळे अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी धावून आले. सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी पावसामुळे अडकलेल्या लोकांना आव्हान करत एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात बांदेकर म्हणाले की, प्रभादेवीच्या परिसरात अडकलेल्या लोकांनी सिद्धिविनायक मंदिराशी संपर्क साधावा. इथे त्यांच्यासाठी प्रसादाची आणि स्थिती सुरळीत होईपर्यंत राहण्याची व्यवस्था केली आहे. पहा हा व्हिडिओ:

मागील 24 तासांपासून सतत मुसळधार पाऊस पडत असल्याने मुंबईतील सार्वजनिक गणेश मंडपात पाणी भरल्यामुळे सर्व गणेश मंडळाने वीज प्रवाह बंद ठेवावे, असे आवाहन मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीकडून सार्वजनिक गणेश मंडळांना करण्यात आले आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील दोन दिवस अजून जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आणि त्यामुळे लोकांना जर गरज असेल तरच घरा बाहेर पाडण्याचे आव्हान बीएमसी कडून करण्यात आले आहेत.