Death PC PIXABAY

मुंबई मध्ये परतीच्या पावसाने काल रात्री शहराला पूर्णपणे झोडपून काढलं. रस्ते, रेल्वे बघता बघता जलमय झाल्याने अनेकजण अडकून पडले होते. कामावरून घरी जात असतानाच हा पाऊस झाल्याने सारी व्यवस्था कोलमडली होती. पावसातून वाट काढताना मात्र एका 45 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची घटना देखील समोर आली आहे. अंधेरी (Andheri)  मध्ये एमआयडीसी भागात उघड्या मॅनहोल मध्ये पडल्याने तिचा जीव गेला आहे. ही घटना रात्री 9.20 च्या सुमाराची आहे. मृत महिलेचं नाव विमल अनिल गायकवाड आहे.

बीएमसी अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, 45 वर्षीय विमल गायडवाड यांचा उघड्या ड्रेनेज मध्ये पडून मृत्यू झाला आहे. हा ड्रेनेज अंधेरीच्या एमआयडीसी भागात होता. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमक दलाचे अधिकारी तेथे पोहचले. तिला बाहेर काढून कूपर हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले पण तो पर्यंत तिचा मृत्यू झाला होता. नक्की वाचा: Weather Forecast: मुंबईसह ठाणे, रायगड आणि रत्नागिरीसाठीही पावसाचा रेड अलर्ट, नागरिकांना सतर्कतेचा इशारा.  

मुंबई काल रात्री सर्वदूर मुसळधार पाऊस पडत होता. अनेक ठिकाणी पाणी साचल्याने गाड्या पुढे सरकणं कठीण होते अशा वेळी अनेकांनी पाण्यातून चालत जाण्याचा मार्ग निवडला. दरम्यान रात्री जागोजागी पाणी साचलं असल्याने आणि अंधार असल्याने विमल यांना शोधण्यात अडथळे आले आणि नाल्यात पडलेल्या विमल यांना जीव गमवावा लागला. अंधेरी पूर्व परिसरातील वेरावली जलशयाजवळ ही दुर्घटना घडली आहे. या घटनेनंतर नाल्यावर झाकणं का नव्हतं? असा सवाल संतप्त नागरिकांनी विचारला आहे.

कुटुंबाकडून बीएमसी विरूद्ध तक्रार दाखल

ndtv च्या रिपोर्ट्सनुसार, मृत महिला विमल गायकवाड यांचे पती आज या घटनेनंतर बीएमसी विरूद्ध पोलिस स्टेशन मध्ये तक्रार करण्यासाठी पोहचले आहेत.  मृत महिलेच्या नातेवाईक उषा साबळे यांनी आपल्याला या घटनेची माहिती रात्री 11.30 च्या सुमारास मिळाल्याचं म्हटलं आहे. पोलिस स्टेशन मधून फोन आला होता. बीएमसी कडून अशा ठिकाणी कोणताच साईन बोर्ड का नव्हता? ही बाब म्हणजे पालिकेचा निष्काळजीपणा असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. सध्या बीएमसी कडूनही या घटनेबद्दल चौकशी सुरू आहे.

 

दरम्यान आज मुंबई शहरात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई शहर आणि उपनगरात आज काही ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह जोरदार ते अति जोरदार पाऊस बरसण्याचा अंदाज आहे.  ४० ते ५० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहण्‍याची शक्यता आहे. असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.