Representational Image (Photo Credit: IANS)

मुंबई सह ठाणे जिल्ह्यात होत असलेल्या दमदार पर्जन्यवृष्टीचा परिणाम रेल्वे वाहतूकीवर झाला आहे. मुंबईची लाईफलाईन असलेली रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. ठाणे शहरासह डोंबिवली, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर या भागांनाही पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले असून बदलापूरहून मुंबईच्या दिशेने येणारी लोकलसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

सुरुवातीला धीम्या गतीने सुरु असणारी वाहतूक सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे बंद करण्यात आली आहे. कल्याण रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले असून रेल्वे रुळ पाण्याखाली गेले आहेत. महाराष्ट्रातील पावसाचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

पहा व्हिडिओ:

कल्याण शिवाय ठाणे, मुलुंड स्थानकातही पाणी साचले आहे. दमदार पावसाचा परिणाम हार्बर मार्गावरही झाला असून लोकल ट्रेन्स 15-20 मिनिटे विलंबाने धावत आहेत.

ठाण्यातही रात्रीपासून दमदार पावसाने हजेरी लावल्याने जागोजागी पाणी साचले असून रेल्वे, रस्ते वाहतूकीवर परिणाम झाला आहे. तसेच ठाण्यातील शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. ठाणे पोलिसांनी हेल्पलाईन नंबर जारी केले असून आत्पकालीन परिस्थितीत नागरिक त्या क्रमांकावर संपर्क करु शकतात.

मुंबई ठाणे जिल्ह्यासह कोकण, नाशिक, पालघर या भागातही मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून किनारपट्टीजवळील नागरिकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे पुणे, नाशिक, अहमदनगर, औरंगाबाद या ठिकाणी येत्या 24 तासांत अतिवृष्टीचा इशारा स्कायमेटकडून वर्तवण्यात आला आहे.